सावळीसदोबा : जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा सावळीसदोबा : परिसरातील नागरिकांसाठी आर्थिक व्यवहाराकरिता असलेली मध्यवर्ती बँकेची सावळी सदोबा शाखा तोकड्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालत आहे. या प्रकारात बँकेच्या ग्राहकांची कमालीची गैरसोय होत आहे. कुठल्याही व्यवहारासाठी तासन्तास ताटकळत रहावे लागते. शेतकऱ्यांची बँक असलेल्या या शाखेत शेतकऱ्यांनाच लांबच्या लांब रांगेत उन्हातान्हात उभे रहावे लागते. शिवाय कर्मचारी, निराधार, श्रावणबाळ आदी योजनेचे लाभार्थीही त्रस्त झाले आहेत. व्यवहारासाठी पाच संगणक देण्यात आलेले आहे. मात्र तेच चालविणार कोण हा प्रश्न आहे. शाखा व्यवस्थापक आणि इतर एक कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत आहे. या शाखेमध्ये एम.एल. धुगे या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. मात्र ते आर्णी शाखेमध्ये काम पाहत आहे. ए.के. पारधी हे कर्मचारी सतत गैरहजर राहतात. हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे शाखा व्यवस्थापक एस.डब्ल्यू. पाचकोर यांनी सांगितले. वास्तविक या शाखेला पाच कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु केवळ दोघांच्या भरवशावर काम सुरू आहे. तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती तत्काळ करावी यासाठी बँक प्रशासनाला कळविण्यात आले आहे. या नियुक्त्या कधी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या बँकेतच शेतकऱ्यांचे हाल
By admin | Published: March 12, 2017 1:02 AM