विदर्भात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र
By Admin | Published: July 16, 2014 12:29 AM2014-07-16T00:29:31+5:302014-07-16T00:29:31+5:30
विदर्भात दुष्काळाचे सावट अधिक तीव्र झाले असून तिबार पेरणीसुद्धा नष्ट झाल्यामुळे मागील दोन दिवसात विदर्भातील तीन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.
यवतमाळ : विदर्भात दुष्काळाचे सावट अधिक तीव्र झाले असून तिबार पेरणीसुद्धा नष्ट झाल्यामुळे मागील दोन दिवसात विदर्भातील तीन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. विदर्भाच्या नागपूर, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात या आत्महत्या झाल्या असून मागील चार दिवसात शेतकऱ्यांच्या सहा आत्महत्यांचे प्रकार समोर आले आहे.
भीषण दुष्काळाच्या सावटामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीची पाळी आली आहे. संकटांनी हवालदिल झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरकारी मदत, बियाणे व नवीन कर्ज मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे हे लोण सर्व विदर्भात पसरण्याची भीती विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
शनिवारच्या रात्री यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याच्या घोटी या गावच्या प्रयाग भुराजी जाधव या दुबार आणि तिबार पेरणी मोडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. सदर शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपले रोजगार हमी योजनेची थकीत मदत न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
घाटंजी तालुक्यातील सर्वच शेतकरी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हवालदिल झाले असून अनेकांच्या घरी खाण्यास अन्न नाही. जनावरांना चारा नाही. अमरावती जिल्ह्यातील उतखेड येथील कैलाश गटफणे व नागपूर जिल्ह्यातील भरदड येथील सुभाष राऊत या दोन शेतकऱ्यांनीही दुबार व तिबार पेरणीच्या संकटाने जीवनयात्रा संपविल्याचे पुढे आले आहे. एकीकडे यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना शासन
मात्र कुठलाच निर्णय घेताना दिसत नाही. विदर्भ जनआंदोलन समितीच्यावतीने बियाणे-खतासाठी मदत व पीक कर्ज वाटप करा, या मागणीसाठी १२ जुलै रोजी पांढरकवडा येथील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण सत्याग्रहाचे आयोजनही केले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील वाऱ्हा कवठा येथील शेतकरी जयंत मिसाळ यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. दुबार पेरणी वाया गेल्यानंतर तिबार पेरणीसाठी बियाणे मिळावे, यासाठी जयंत याने आदिलाबाद, पाटणबोरी व पांढरकवडा येथे प्रयत्न केले. मात्र यामध्ये त्याला अपयश आले. असेच तिबार पेरणीचे संकट घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथील कोरडवाहू शेतकरी दादाराव मोरे याच्यावर आल्यामुळे त्यानेसुद्धा आपली जीवनयात्रा संपविली होती. विशेष म्हणजे दादाराव मोरे यांना याच महिन्यात जिल्हा सहकारी बँकेने वसुलीची नोटीस बजावल्याचे प्रकरणही समोर आले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना प्रशासन व शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन वर्षांपासून विदर्भात सतत दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यंदासुद्धा भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुबार पेरणीसाठी २५ हजार रुपये हेक्टरप्रमाणे मदत, नवीन पीककर्ज, अन्न व चारा यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव शेती शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांच्या शिफारशीप्रमाणे कर्ज व ५० टक्के नफा या फॉर्म्युल्याप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणीसुद्धा तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
(शहर प्रतिनिधी)