म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत अखेर राजूर पीठचे पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले.शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून २० दिवसापासून नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे १३ प्रभागात २६ टँकरद्वारे पाण्याचे वितरण करण्यात येत होते. प्रत्येक कुटुंबाला २०० लीटरप्रमाणे पाणी वाटप करण्यात आले. शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत प्रशासनाने नवरगाव धरण व राजूर पीठचे पाणी नदीत सोडून वणीकरांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. राजूर पीठमधून येणाºया पाण्याची पाईपलाईन जागोजागी लिकेज असल्यामुळे तिच्या दुरूस्तीचे काम आता युद्धस्तरावर सुरू आहे.राजूर पीठ सेक्शन लाईन, रामदेवबाबा मंदिर व लालपुलिया परिसरात मोठे लिकेजेस असून ते बंद करण्यात आले आहे. या पाईपलाईनद्वारे येणारे पाणी लालपुलियामार्गे सोमवारी सायंकाळी ६ वाजता जॅकवेलपर्यंत पोहोचले. मात्र पाणी कमी प्रमाणात येत असल्यामुळे मंगळवारी रात्री जेसीबीच्या साह्याने निंबाळा गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ बुजून असलेली पाईपलाईन सरळ करण्यात आली. ही पाईपलाईन तुंबून असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जात होते. मात्र आता हा पाणी पुरवठा सुरळीत झाला असून पाण्याचा वेगही वाढला आहे. या आठ इंची पाईपलाईनमधून २० लाख लीटर पाणी नदीत सोडल्या जाणार आहे. याकरिता वेकोलिने नियोजन केले असून १५ हजार हॉर्स पॉवरचे दोन पंप सुरू केले आहे. तसेच नवरगाव धरणातून रविवारी दुपारी १२.३० वाजता ००.२० दलघमी पाणी सोडले असून धरणात केवळ ३.४९ दलघमी म्हणजे ३१ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी वणीपर्यंत मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास निर्गुडा नदीत पोहोचले. त्यामुळे बुधवारी काही ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात आला. तसेच राजूर पीठचेही पाणी आता नदीत सोडल्याने चार दिवसानंतर पाणी वितरीत होण्याची शक्यता आहे. राजूर पीठच्या पाण्यासाठी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला असून १४ नगरसेवकांनीही हा प्रश्न उचलून धरला होता. तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व सर्व नगरसेवकांनी पाण्यासाठी पुढाकार घेतला.
अखेर राजूर पीठचे पाणी निर्गुडा नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:34 AM
यावर्षी अल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदीने दम सोडला, तर नवरगाव धरणात अल्प जलसाठा असल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने राजूर पीठचे पाणी नदीत सोडण्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.......
ठळक मुद्दे‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश : पाईपलाईन दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात