रस्ता चौपदरीकरणात व्यवसाय चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:13 PM2018-03-29T22:13:43+5:302018-03-29T22:13:43+5:30

‘दररोज तीन ते चार हजार रुपयांची विक्री व्हायची. आता ४०० ते ५०० रुपये धंदा होतो. त्यातून मजुरी गेल्यावर शंभर रुपये उरतात. कर्जबाजारी होण्याची वेळ आली.

Four-fourths of the roads in business | रस्ता चौपदरीकरणात व्यवसाय चौपट

रस्ता चौपदरीकरणात व्यवसाय चौपट

Next
ठळक मुद्देआर्णी मार्ग : खोदकामाने दुकानात जाणे कठीण, ग्राहकांनी फिरविली पाठ

ज्ञानेश्वर मुंदे ।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : ‘दररोज तीन ते चार हजार रुपयांची विक्री व्हायची. आता ४०० ते ५०० रुपये धंदा होतो. त्यातून मजुरी गेल्यावर शंभर रुपये उरतात. कर्जबाजारी होण्याची वेळ आली. सांगा आम्ही जगायचे कसे’, असा प्रातिनिधिक सवाल आर्णी मार्गावरील हॉटेल व्यावसायिक गोवर्धन गुल्हाने यांनी केला. गत सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या रस्ता चौपदरीकरणाने आर्णी मार्गावरील सर्व व्यवसाय चौपट झाले आहे. व्यावसायिक हातावर हात ठेवून कधी एकदा काम संपते, याची प्रतीक्षा करीत आहे.
शहरातील आर्णी मार्ग म्हणजे प्रतिमार्केट होय. शहरातील मेनलाईनऐवढीच बाजारपेठ या रस्त्याने फुलली आहे. याभागातील अनेकजण लांब जाण्याऐवजी आर्णी मार्गावरूनच खरेदी करणे पसंत करतात. मात्र यवतमाळ शहरातील आर्णी मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या रस्त्यामुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे. परंतु सप्टेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या या बांधकामामुळे अनेकांचे धंदे चौपट झाले आहे. सुरुवातीला नालीसाठी खोदकाम झाले. पाच फुटाच्या नाल्या खोदण्यात आल्या. दुकानदारांनाही दुकानात जाता येत नव्हते. काही दिवस दुकान बंद ठेवावे लागले. त्यानंतर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले. या रस्त्यावरून आता यवतमाळकर जाण्यासही टाळतात. वाहन कुठे ठेवावे, असा प्रश्न असतो. महिला ग्राहकांना तर या रस्त्यावरून दुकानात जाताही येत नाही.
आर्णी नाका परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून फूल विक्रीचा व्यवसाय करणारे मुरलीधर शिंगोटे सांगत होते, रस्ता बंद झाला आणि ग्राहकी एकदम थंडावली. ग्राहकांना दुकानापर्यंत पोहोचता येत नाही. फूल घेण्यासाठी वृद्ध त्यातही महिला भाविक येतात. परंतु रस्त्याच्या बांधकामामुळे कुणीही येत नाही. ताजी फुले धुळीमुळे काळवंडतात. त्याचा आर्थिक फटका आम्हालाच सहन करावा लागतो, असे ते म्हणाले. एका किराणा व्यावसायिकाने आपबिती सांगितली. ते म्हणाले, आमच्याकडे दरमहाचे अनेक ग्राहक होते. परंतु आता वाहन येत नसल्याने विक्री ४० टक्क्यांवर आली आहे. स्टिल भांडी व्यावसायिक मोहन निलगुरकर म्हणाले, आमचे दुकान उघडे असते. परंतु खड्ड्यांमुळे कुणीही येत नाही. सध्या लग्नसराईचा सिजन आहे. परंतु ग्राहक येत नाही. रस्ता पुर्ण होईपर्यंत आमच्या व्यवसायाचे काही खरे नाही, असे ते म्हणाले.
इंदिरा मार्केटमध्ये दुकानाला प्लास्टिकचे पडदे
अमृत योजनेच्या पाईपलाईनसाठी इंदिरा गांधी मार्केटमध्ये खोदकाम करण्यात आले. या भागात प्रचंड धूळ झाली आहे. कापड व्यावसायिक या धुळीमुळे त्रस्त झाले आहे. कपड्यावर धूळ साचत असल्याने ग्राहक कापड जुने आहे का, असे विचारतात. यावर पर्याय म्हणून या व्यावसायिकांनी आपल्या दुकानांना प्लास्टिकचे पडदे लावले आहे. तसेच दर तासाला दुकानाची साफसफाई करावी लागते. खाद्यपदार्थ व्यावसायिक तर धुळीने पुरते वैतागले आहे.

Web Title: Four-fourths of the roads in business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.