शिक्षणाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 09:58 PM2018-07-04T21:58:36+5:302018-07-04T21:59:26+5:30
नवीन सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात करा, असे फर्मान सोडण्यात आले. पण विद्यार्थ्यांच्या हाती याच दिवशी पूर्ण पुस्तके पडतील याची दक्षता घेण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नवीन सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात करा, असे फर्मान सोडण्यात आले. पण विद्यार्थ्यांच्या हाती याच दिवशी पूर्ण पुस्तके पडतील याची दक्षता घेण्यात आली नाही. अभ्यासक्रम बदललेल्या आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग राखावा लागला. शिवाय पाचव्या वर्गाची पुस्तके वितरणात दुजाभाव चालविला. चौथीचा वर्ग जोडून असलेल्या शाळांनाच पाचवीची मोफत पुस्तके दिली जात आहे. एकूणच जिल्ह्यात मोफत शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश, पूर्ण पाठ्यपुस्तके अपवादानेच मिळालेली आहे. यावर्षीही तेच घडले. पालकांनी घेऊन दिलेली बुकं दप्तरात टाकून विद्यार्थी शाळेत पोहोचले. मात्र त्यांच्या हाती पुस्तकाचा पूर्ण संच पडलाच नाही. काही विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तकांवर भागवावे लागले आणि लागत आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातील शाळांनाही याचा अनुभव येत आहे. पुस्तकांचे गठ्ठे वाहनाने शाळांमध्ये पोहोचले. त्यात काही ठिकाणी एकाच विषयांची अधिक तर, काही विषयांची कमी पुस्तके टाकली गेली आहे.
चौथीचा वर्ग जोडून असलेल्या शाळांनाच पाचवीची पुस्तके द्यायची, असा प्रकारही येथे घडला आहे. गतवर्षीपर्यंत असे होत नव्हते. यावेळी मात्र याचीही सुरुवात झाली आहे. यातही दुजाभाव झाल्याची ओरड आहे. चौथीचा वर्ग जोडून नसलेल्या काही शाळांना पाचवीची पुस्तके मिळाली असल्याचे मान्य केले जात आहे. यावर्षी आठव्या वर्गाचा संपूर्ण अभ्यासक्रम बदलेला आहे. नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. गतवर्षीपर्यंत जुन्या पुस्तकावर भागविले जात होते. यावर्षी ती सोयही नाही. पुस्तकाचा पूर्ण संच मिळाला, हे अपवादानेच झाले आहे. आवश्यकतेपेक्षा कमी पुस्तके मिळाल्याचे शाळांकडून सांगितले जाते. १५० विद्यार्थ्यांसाठी ७० ते ७५ पुस्तके आल्याने ती वाटायची कशी, हा प्रश्न काही शाळांपुढे आहे. पुस्तके नसल्याने ज्ञानदानाचा तर विद्यार्थ्यांपुढे विद्याजर्नांचा प्रश्न आहे.
यूडायसमध्ये माहिती भरली गेली नसल्याने चौथीचा वर्ग जोडून नसलेल्या शाळांना पाचवीची पुस्तके उपलब्ध होऊ शकली नाही. शिवाय इतर वर्गांना अद्याप पुस्तके वितरित झाली नसली तरी लवकरच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील.
- शेषराव राठोड,
गटशिक्षणाधिकारी यवतमाळ