घाटंजीत चटणी-भाकर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 09:30 PM2018-11-03T21:30:38+5:302018-11-03T21:30:56+5:30
दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडची चटणी-भाकर हिरावली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने मोर्चा काढून थेट मुख्यमंत्र्यांनाच चटणी-भाकरीचे दान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडची चटणी-भाकर हिरावली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने मोर्चा काढून थेट मुख्यमंत्र्यांनाच चटणी-भाकरीचे दान दिले.
तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे शेतकरी संतापले आहे. संतप्त शेतकरी येत्या निवडणुकीत शिल्लक ठेवलेली चटणी वापरतील. ती साखर, तूप खाणाऱ्यांना सहन होणार नाही, असा इशारा शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी दिला. मोर्चा तहसीलवर धडकेल्यानंतर ते सभेत बोलत होते. यावेळी माजी आमदार अॅड.विजयाताई धोटे, मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, किरण कुमरे, शैलेश इंगोले, हेमंतकुमार कांबळे उपस्थित होते. नापिकीसह जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यासाठी नुकसान भरपाई कोणत्याही अटीशिवाय मिळावी, अथवा त्यासाठी विशेष विम्याची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
शैलेश इंगोले यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या मोर्चात शेतकरी चटणी-भाकर घेऊन सहभागी झाले. आदिवासी दंडारीत पारंपारिक वेशभूषेत केलेल्या नृत्यांमुळे मोर्चाने घाटंजीकरांचे लक्ष वेधले. तहसील कार्यालयावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तेथे शेतकऱ्यांनी मोठ्या टोपल्यात भाकरी गोळा करून तहसीलदार हामंद यांच्या स्वाधीन केल्या. भाकरींचे दान मुख्यमंत्र्यांना पोहचविण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली. तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा, जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा, आदी मागण्या यावेळी शेतकºयांनी केल्या.