गोरक्षण संस्थेला एक कोटीचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:02 AM2018-07-16T00:02:20+5:302018-07-16T00:05:00+5:30
गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थेला एक कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. गोवर्धन, गोवंश, गोसंवर्धन योजनेतून हा निधी या संस्थेला प्राप्त होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गोसेवेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थेला एक कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. गोवर्धन, गोवंश, गोसंवर्धन योजनेतून हा निधी या संस्थेला प्राप्त होणार आहे. या निधीतून गोसंवर्धानासाठी आवश्यक असलेल्या बाबी पूर्णत्वास नेल्या जाईल, अशी माहिती शनिवारी आयोजित आमसभेत देण्यात आली. यावेळी संस्थेतर्फे गोसेवकांचा सत्कार करण्यात आला. परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनेसाठी जिल्ह्यातून १४ प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडे सादर झाले होते. यामध्ये गोरक्षण संस्थानचे उपक्रम, अंकेक्षण आणि गोपालनाच्या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबीमध्ये येथील तलाव फैलातील गोरक्षण संस्थान अव्वल ठरले. यामुळे ही संस्था एक कोटींच्या अनुदानाची मानकरी ठरली आहे. चार टप्प्यात संस्थेला अनुदान मिळणार आहे. यातून गाईसाठी शेड, साठवणूक गोदाम आणि गाईचे शेण आणि गोमूत्रापासून विशिष्ट प्रकारचे उत्पादन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी उत्कृष्ट गोसेवेसाठी शंकरलाल नौबतराम सिंघानिया आणि सिंधी समाज महिला मंडळाला पुरस्कार जाहीर झाला. सिंधी समाज मंडळातर्फे रेखा बागाई, कृष्णा बखत्यार यांना गोसेवा मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गोरक्षणच्यावतीने दरवर्षी असा प्रकारचा पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. याठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. आमसभेत सादर करण्यात आलेल्या जमा खर्चास एकमताने मंजुरी देण्यात आली.
या सभेत येणाºया श्रावणाच्या निमित्ताने एक गाय दोन महिन्यासाठी दत्तक योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत जो कोणी दोन महिन्यासाठी गाय दत्तक घेईल त्याला पाच हजार १०० रुपये देणगी ठेवण्यात आली आहे. यामध्ये गाईचा चारा, पाणी, पूर्ण संगोपण याचा समावेश आहे. या योजनेसाठी संबंधितांनी गोरक्षण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन गोरक्षणच्यावतीने करण्यात आले आहे. या योजनेच्या सुरुवातीलाचा दोन महिन्यासाठी लव किशोर दर्डा व सोनाली लव दर्डा यांनी गाय दत्तक घेऊन योजनेचा शुभारंभ केला आहे.
यावेळी गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष अनिल अटल, सचिव किसनलाल सिंघानिया, सहसचिव घनश्याम बागडी, कोषाध्यक्ष केतन मजेठिया, किशोर दर्डा, डॉ.सुरेंद्र पद्मावार, रामजीलाल शर्मा, ब्रिजमोहन भरतिया, हरबक्षराय वाधवाणी, जयंत सूचक, भरत शहा, राजेंद्र निमोदिया, प्रदीप ओमनवार, नंदलाल बागडी, चंद्रशेखर मोर, जुगलकिशोर लढ्ढा, सत्यनारायण मुंधडा, नंदलाल मुंधडा, राधाकिसन धुत, पं.शिवनारायण शर्मा, सतीश फाटक, श्रीकिसन झंवर, कैलास लष्करी, गणेश सिंघानिया, रोहित पाटील, नाना इंगळे, बाबूलाल बागडी, कमलकिशोर भट्टड, राजेश लोहाणा आदी उपस्थित होते.