अखेर पालकमंत्री बदलले

By admin | Published: December 30, 2016 12:06 AM2016-12-30T00:06:05+5:302016-12-30T00:06:05+5:30

जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याने पालकमंत्रीही भाजपाचाच द्यावा,

The Guardian Minister finally changed | अखेर पालकमंत्री बदलले

अखेर पालकमंत्री बदलले

Next

मदन येरावारांकडे जिल्ह्याची धुरा : संजय राठोडांकडे वाशिम
यवतमाळ : जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याने पालकमंत्रीही भाजपाचाच द्यावा, ही मागणी दोन वर्षानंतर का होईना प्रत्यक्षात साकारली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ऊर्जा व बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांची वर्णी लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले.
गेली दोन वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळणाऱ्या महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे लगतच्या वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्रीपदी बदल करताना ‘सहपालकमंत्री’ हे पद निर्माण करण्यात आले आहे. यवतमाळात आता ना. येरावार हे पालकमंत्री तर ना. संजय राठोड हे सहपालकमंत्री राहणार आहे. या उलट क्रम वाशिममध्ये राहील. तेथे ना. राठोड पालकमंत्री तर ना. मदन येरावार सहपालकमंत्री राहणार आहे. वाशिमची अतिरिक्त जबाबदारी आतापर्यंत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे होती. मुख्यमंत्री गुरुवारी कळंबच्या दौऱ्यावर आले होते. येथून मुंबईत परतताच नव्या पालकमंत्र्यांची यादी जारी करण्यात आली. ते पाहता कळंबमध्येच पालकमंत्री बदलाचे राजकारण शिजले असावे, असा तर्क राजकीय गोटात लावला जात आहे.
निवडणुकीसाठी ‘बुस्ट’
फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. येरावार यांना मिळालेले पालकमंत्रीपद म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ‘जिल्ह्यात भाजपाला बुस्ट’ दिल्याचे मानले जाते. या पालकमंत्रीपदाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत गतवेळ पेक्षा अधिक जागा खेचून आणण्याची जबाबदारी ना. येरावार आणि पक्षाच्या अन्य चार आमदारांवर वाढली आहे, एवढे निश्चित.
भाजपा कार्यकर्ते सुखावले
एकमेव आमदार असताना शिवसेनेला जिल्ह्याचे पालकमंत्री पद कसे ? असा प्रश्न उपस्थित करीत मदन येरावार यांनी सुरुवातीपासूनच ‘चेंज’चा नारा दिला होता. त्यांना जिल्ह्यातील आमदारांचीही साथ लाभली. भाजपाच्या या मंत्री-आमदारांकडून दबाव वाढल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनाही पालकमंत्री पदावरील हा फेरबदल अधिककाळ टाळता आला नाही. गुरुवारी ना. मदन येरावार यांच्या नावावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची मोहर उमटविण्यात आली. या बदलामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर शिवसैनिकांमध्ये काहीसा निरुत्साह पहायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

युतीचा फॉर्म्युला फेल
जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली असता ना. संजय राठोड यांनी हा बदल अशक्य असल्याचे सांगताना युतीचा फॉर्म्युला पुढे केला होता. सरकार स्थापनेच्यावेळी पालकमंत्री म्हणून भाजपा आणि शिवसेनेचे जिल्हे निश्चित झाले आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, त्यामुळे पालकमंत्री बदलाच्या चर्चा ना. राठोड यांनी निरर्थक ठरविल्या होत्या. परंतु गुरुवारी झालेला ‘चेंज’ पाहता युतीचा कथीत फॉर्म्युलाच निरर्थक ठरल्याचे दिसून येते.

 

Web Title: The Guardian Minister finally changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.