अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धंदा बुडाला तर कुटुंबाला विमा वाचवतो, नोकरी गेली तर पेन्शन वाचवेल... पण मजुराचा पाय गेला तर..! तर काही नाही. त्याला उरलेल्या पायाच्या बळावर मजुरी करावीच लागेल. तरच तो जगेल, लेकरांना जगवू शकेल... होय, होरपळून काढणाऱ्या उन्हात दगड फोडून कुटुंब जगवणाºया महादेवाची ही कहाणी त्याच असहायतेची कडवी बाजू सांगणारी आहे.यवतमाळजवळच्या खानगावात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी भरउन्हात दगडांच्या ढिगावर बसूनच तो दगडांवर घनाचे घाव घालतोय. बसून यासाठी की त्याचा पाय अधू आहे. बाजूलाच त्याच्या कुबड्या पडलेल्या. घन उचलण्यासाठी पत्नी संगीताची साथ मिळतेय. बाजूच्याच ढिगावर त्याची तीन लेकरं खेळताहेत. त्या पलिकडच्या ढिगावर त्याचे म्हातारे आई-बाबा घन घालताहेत...महादेव दादाराव जिरे नावाच्या तरुणाचे हे कुटुंबचित्र आहे. तो भटक्या जमातीत जन्मला. दगड फोडण्याचे काम करत गावोगावी फिरणारे कुटुंब. त्यामुळे शिक्षणाचा गंध नाहीच. चार वर्षांपूर्वी काम करता-करताच भरधाव ट्रकने घात केला अन् महादेवचा एक पाय गेला. पाय गेला म्हणून मजुरी गेली. पण संसार जगवायचा होताच. म्हणून तुटलेला पाय घेऊन तो आजही दगड फोडतो, दिवसाला २०० रुपये मिळवतो.दुर्दैव एवढेच, की त्याला घरकुल नाही. आधार कार्ड नाही. एवढेच काय, मतदार म्हणूनही त्याची नोंद नाही. मतदार नसलेल्या माणसाला कोणता राजकीय कार्यकर्ता मदत करेल? नाहीच केली कोणी मदत. कामगार कार्यालयात कामगार म्हणूनही नोंदणी करायची झाली, तर कागदपत्रे लागतात. म्हणून दिवसभर काम करणारा महादेव शासनदरबारी कामगार नाही. वृद्ध आई-वडीलांचा आपणच आधार आहो, हे महादेवला ठाऊक आहे. पोटच्या तीन लेकरांचे चेहरे पाहून, बायकोची साथ मिळवून महादेव अपंगत्वाला न जुमानता कष्ट उपसतो आहे. त्याच्या आयुष्यात सुख तिळाएवढे आहे आणि दुनियेने दिलेले दु:ख डोंगराएवढे आहे. तरी हिंमत हीच त्याची आणि त्याच्या कुटुंबाची दौलत आहे.पोरांना शाळा मिळेल का?महादेवची मोठी पोरगी गौरी सात वर्षांची आहे. गेल्या वर्षीच त्याने तिला शाळेत घालण्याचा प्रयत्न केला. तर वयात बसत नाही, म्हणून परत पाठविण्यात आले. आता यंदा शिक्षक स्वत: येऊन गौरीला आमच्या शाळेत टाका म्हणून महादेवला सांगून गेले. पण गौरीला शाळेत टाकले तर गावाकडे ती एकटी कशी राहील, ही काळजी महादेव-संगीताला वाटतेय. महादेव एकटाच नव्हे, तर जवळा ईजारा गावातील जवळपास २० कुटुंबांची हीच अवस्था आहे. मजुरीसाठी त्यांची भटकंती सुरू आहे. अन् पोरांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे.
सुख थोडे दु:ख भारी... दुनिया ही भलीबुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 9:49 PM
धंदा बुडाला तर कुटुंबाला विमा वाचवतो, नोकरी गेली तर पेन्शन वाचवेल... पण मजुराचा पाय गेला तर..! तर काही नाही. त्याला उरलेल्या पायाच्या बळावर मजुरी करावीच लागेल. तरच तो जगेल, लेकरांना जगवू शकेल... होय, होरपळून काढणाऱ्या उन्हात दगड फोडून कुटुंब जगवणाºया महादेवाची ही कहाणी त्याच असहायतेची कडवी बाजू सांगणारी आहे.
ठळक मुद्देकहाणी दगडाच्या महादेवाची : घर, ‘आधार’, ‘मतदार’ही नाही, पाय तुटला तरी दगड फोडून जगणे सुरू