जिल्ह्यात उष्णतेची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:09 PM2018-04-20T23:09:18+5:302018-04-20T23:09:18+5:30
सूर्य आग ओकत असून उन मी म्हणत आहे. पारा ४३ अंशावर पोहचला असल्याने दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. नागरिकांना प्रचंड तापमानाचा सामना करावा लागत असून पाणीटंचाईने कुलर काढण्याची सोय नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सूर्य आग ओकत असून उन मी म्हणत आहे. पारा ४३ अंशावर पोहचला असल्याने दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. नागरिकांना प्रचंड तापमानाचा सामना करावा लागत असून पाणीटंचाईने कुलर काढण्याची सोय नाही.
विदर्भात सध्या उष्णतेची लाट आली आहे. जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. ११ ते १५ एप्रिलपर्यंत ३६ ते ३८ अंश तापमानाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली होती. १५ एप्रिल रोजी पारा ४०.५ अंशावर जाऊन पोहोचला. १७ एप्रिलपासून तर तापमानाने कळस गाठणे सुरू केले. तीन दिवस पारा ४२.५ अंशावर स्थिर होता. गुरूवारी यवतमाळचे तापमान ४३ अंश नोंदविले गेले. शुक्रवारी तापमान ४२.५ अंश होते. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाने नागरिक हैराण झाले आहे. वातावरणात अचानक शुष्कता निर्माण होऊन तापमान प्रचंड वाढले आहे. यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. दुपारी रस्ते भट्टी सारखे तापलेले असतात. या उन्हामुळे आजार बळावण्याची शक्यता बळावली आहे.
उन्हापासून बचाव करण्याचे प्रयत्न सर्वच जण करीत आहेत. मात्र यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई असल्याने कुलर काढण्याचीही सोय नाही. अनेकांनी कुलर काढले, परंतु पाणीच नसल्याने घामाच्या धारात भिजण्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातही अशीच अवस्था निर्माण झाली आहे.
वाढत्या तापमानाचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र भूजल पातळी खालावली आहे. अशातच आता तापमान वाढत असल्याने ही पातळी आणखी खाली जात आहे. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी टाकला सिग्नलवर मंडप
तळपत्या उन्हामुळे सिग्नलवर दोन मिनीट थांबणेही असह्य होते. यावर उपाय म्हणून एलआयसी चौकातील सिग्नलवर पोलीस दलाच्यावतीने चक्क ग्रीन शेड नेटचा मंडप टाकला आहे. चारही बाजूला ग्रीन शेड नेट आच्छादले असून यामुळे तात्पुरती सावली निर्माण होऊन वाहनधारकांना सिग्नलवर थांबणे सुसह्य होते. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाने उन्हाळा मात्र काहीसा सुसह्य होणार आहे. शहरातील विविध भागात काही दुकानदारांनीही आपल्या दुकानासमोर ग्रीन शेड नेटचे मंडप टाकले आहे.