यवतमाळात दारूची होळी
By admin | Published: March 13, 2017 12:56 AM2017-03-13T00:56:37+5:302017-03-13T00:56:37+5:30
जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करणाऱ्या महिलांनी रविवारी होळीच्या दिवशी चक्क दारूचीच होळी केली.
दारूबंदीसाठी घोषणा : ‘बोल गं मावशी हल्लाबोल, या दारूवरती हल्लाबोल’
यवतमाळ : जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने करणाऱ्या महिलांनी रविवारी होळीच्या दिवशी चक्क दारूचीच होळी केली. या अभिनव आंदोलनात जिल्हाभरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. ‘बोल गं मावशी हल्लाबोल, या दारूवरती हल्लाबोल’, अशा घोषणांनी शासनाला जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्वामिनी दारूमुक्त जिल्हा अभियानाच्या वतीने पोस्टल मैदानाजवळील तिरंगा चौकात हे अभिनव आंदोलन करण्यात आले. अभियानाचे जिल्हा संयोजक महेश पवार यांच्या पुढाकारात महिलांनी होळी उभारली. त्यात दारूच्या बॉटल टाकून होळी भडकवली. तंबाखू, गुटख्याच्या पुड्याही टाकण्यात आल्या. वाईट गोष्टी होळीत जाळून नष्ट करण्याची परंपरा आहे. दारू किंवा इतरही व्यसने संसार उद्ध्वस्त करीत आहे. त्यामुळे व्यसनांचा नायनाट करण्यासाठी दारूची होळी केल्याचे महेश पवार यांनी सांगितले. होळीसारख्या सणाला दारूचा महापूर वाहतो. दारू पाजून पैसे कमावणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत महामार्गालगतची सर्व दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, तसेच जिल्ह्यातील उर्वरित दारू दुकानेही सरकारने त्वरित बंद करावी, अशी मागणी स्वामिनीने केली आहे.
या प्रसंगी मुख्य संयोजक महेश पवार, मनिषा काटे, बालाजी कदम, रवी पंचकोशी, मनोज राठोड, वर्षाताई निकम, पियूष गाब्राणी, भावना नव्हाते, विनोद देवतळे, शेखर सरकुटे, प्रशांत भोयर, महेश तिल्लारे, राजू राठोड, सपना श्रीकांत लोढम, दिनकरराव चौधरी, योगेश राठोड, किशोर नरांजे, सुषमा गाढवे, सीमा तेलंगे, राजू बुटे, सारीकास ताजणे, एकनाथ डगवार, भूदान यज्ञ मंडळाचे अशोक उमरतकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जोडमोहाच्या महिलेने पेटविली होळी
जोडमोहा येथील जयमाला बोंद्रे या महिलेच्या हस्ते दारूची होळी पेटविण्यात आली. त्यांचा पती दारूच्या व्यसनामुळे अवघ्या १५ दिवसांपूर्वीच दगावला. दोन छोटी मुले पित्याला पारखी झाली. आपल्यासारखे कुणाच्याही संसाराला व्यसनाधीनतेचे चटके बसू नये, यासाठी आपण आंदोलनात सहभागी झाल्याचे जयमाला बोंद्रे म्हणाल्या.