पुसद तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:27+5:30
प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात कोरोनाचे तांडव सुरूच असून शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तीन तर श्ािनवारी पाच अशा आठ रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची शंभरी पार झाली आहे. एकूण बाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे.
शहर व लगतच्या परिसरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी २८ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. तरीही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील ७१ जणांना महागाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी २८ जणांचे अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाले. त्यात रहेमतनगर येथील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. तर एकूण बाधितांची संख्या १०८ वर गेली आहे. रुग्णसंख्येत वाढत होत असल्याने नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी केले आहे.
प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनानेच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पोलिसांनी आपला दंडूका ताकदीने चालविण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने लॉकडाऊन मोडणाऱ्या नागरिकांवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचा वेग वाढविण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात शहर व तालुक्यात समूह संक्रमण होऊन कोरोनाचे रुग्ण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरी भागात लॉकडाऊन असताना ग्रामीण भागात मात्र संचारबंदीची कोणतेही चिन्ह दिसत नाही.
यामुळे भविष्यात ग्रामीण भागालाही कोरोना आपल्या कवेत घेण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
आतापर्यंत गेले सहा बळी
एकूण कोरोना रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली असताना त्यातील सहा जणांचे आतापर्यंत बळी गेले आहे. शनिवारी तालुक्यातील चोंढी येथील एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र ३८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तथापि, रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे.