वन प्रशासनाच्या नाकासमोर अवैध वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:00 PM2019-05-13T22:00:09+5:302019-05-13T22:00:52+5:30
वन खात्याचे तमाम प्रशासन यवतमाळात बसते. मात्र या प्रशासनाच्या अगदी नाकासमोर मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. त्यानंतरही वन प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यदक्षतेचा घाम फुटत नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वन खात्याचे तमाम प्रशासन यवतमाळात बसते. मात्र या प्रशासनाच्या अगदी नाकासमोर मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. त्यानंतरही वन प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यदक्षतेचा घाम फुटत नसल्याचे संतापजनक चित्र आहे.
यवतमाळपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांब रोडवरील बहिरम टेकडीच्या मागील बाजूला अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर सोमवारी मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड करण्यात आल्याची गंभीरबाब निदर्शनास आली आहे. जांबच्या जंगलात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वन्यप्रेमींच्या हा गंभीर प्रकार दृष्टीस पडला. या जागरुक नागरिकांनी ही वृक्षतोड व त्याबाबतची वन्यप्रेमी म्हणून वाटणारी चिंता छायाचित्रांसह ‘लोकमत’कडे मांडली. यातील अनेक झाडे अवघ्या २४ तासापूर्वी तोडली असावी असा वन्यप्रेमींचा अंदाज आहे. काल-परवापर्यंत डौलदारपणे जंगलात उभी असलेली ही परिपक्व सागवान वृक्षे रात्रीतून तस्करांनी बुडापासून कापून नेली. मशीनने नव्हे तर कुºहाडीचे घाव घालून या वृक्षांची तोड केली गेल्याचे आढळून आले.
जांब रोडवरील ही वृक्षतोड प्रातिनिधीक स्वरूपात पुढे आली आहे. प्रत्यक्षात यवतमाळ वनवृत्तातील जंगल आतल्या बाजूने पूर्णत: पोखरले गेले आहेत. रस्त्याने जाताना घनदाट वृक्षे दिसत असली तरी प्रत्यक्षात थोेडे आत गेल्यास जंगलाचे मैदान झाल्याचे भयान वास्तव चहूबाजूने पहायला मिळते. परंतु या वृक्षतोडीकडे वन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एसी-कुलरमध्ये बसून काम चालविण्याच्या वरिष्ठांच्या कार्यपद्धतीचे हे फलित मानले जाते. वरिष्ठ चेंबरच्या बाहेर निघत नाहीत आणि अनेक कनिष्ठ तस्करांशी हातमिळवणी करून जंगलांचा आपल्या नजरेआड लिलाव करीत असल्याचे चित्र आहे.
वन प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या यवतमाळपासून अवघ्या ‘वॉकिंग डिस्टन्स’वर एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षतोड होत असेल तर अन्य जंगलातील व दुर्मिळ, अंतर्गत भागातील जंगलांच्या सुरक्षेची कल्पनाच केलेली बरी. यवतमाळात सीसीएफ, डीएफओ, एसीएफ, आरएफओ, मोबाईल स्कॉड अशा एकापेक्षा एक वन प्रशासनातील अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्यांच्या अधिनस्त वनपाल, वनरक्षक, वनमजूर या सारखी यंत्रणा दिमतीला आहे. मात्र त्यानंतरही शहरी भागात अगदी रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या जंगलात अवैध वृक्षतोड होत असेल तर वन खात्याची ही यंत्रणा खरोखरच किती तत्पर आहे, हे स्पष्ट होते. जांब रोडवरील ही वृक्षतोड यवतमाळ मुख्यालयाच्या तमाम वन प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावणारी ठरली आहे. या वृक्षतोडीच्या चौकशीचे व संबंधित दोषींवरील कारवाईचे या प्रशासनापुढे आव्हान आहे. केवळ चौकशीचा बागुलबुवा उभा करून ही वृक्षतोड दडपली गेल्यास प्रशासनाचीही कुठे तरी अप्रत्यक्ष मिलीभगत तर नाही, अशा शंकेला वाव मिळू शकतो.
यवतमाळचा कारभार अमरावतीवरून
यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) राहूरकर अलिकडेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा अतिरिक्त प्रभार समकक्ष अमरावती येथील सीसीएफ चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. तेव्हापासून अमरावतीवरूनच यवतमाळ वनवृत्ताचा कारभार हाकला जातो आहे. यवतमाळच्या एसीएफचे पदही रिक्त आहे. दारव्ह्याच्या वन अधिकाऱ्याकडे हा अतिरिक्त प्रभार आहे. फिरते पथकाच्या अधिकाऱ्याचे पद तर कित्येक महिन्यांपासून रिक्तच आहे. बहुतांश जागा रिक्त असल्याने प्रभारी अधिकाºयांकडून केवळ खानापूर्ती सुरू असल्याचे सांगितले जाते. या रिक्त पदांचा जंगल व वन्य प्राण्यांच्या संरक्षणावर मोठा विपरित परिणाम होतो आहे. त्याची संधी साधून जंगलात तस्कर, शिकारी सक्रिय झाले आहेत.