यवतमाळच्या ७ मतदारसंघात महायुतीचीच सत्ता ! युती पाच तर आघाडीला दोन जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:47 PM2024-11-23T19:47:08+5:302024-11-23T19:49:14+5:30

Yavatmal Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidates Live Update :यवतमाळच्या रिंगणात महायुतीला चांगले यश

In 7 constituencies of Yavatmal, the power of Mahayuti! Alliance has five seats and Aghadi has two seats | यवतमाळच्या ७ मतदारसंघात महायुतीचीच सत्ता ! युती पाच तर आघाडीला दोन जागा

In 7 constituencies of Yavatmal, the power of Mahayuti! Alliance has five seats and Aghadi has two seats

यवतमाळ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या बाजूने लागत २८८ पैकी २३१ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून काही आघाडीवर आहेत.  भाजप १३३ जागांसोबत राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे तर महाविकास आघाडीला ५० पेक्षाही कमी जागा मिळाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सात मतदार संघातून भाजपला तीन, उद्धवसेनेला एक, शिवसेना शिंदेला एक, काँग्रेसला एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली आहे. 


काँग्रेसचे उमेदवार अनिल मांगुळकर ११३८१ मतांनी विजयी
यवतमाळ :  यवतमाळ मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार अनिल मांगुळकर ११३८१ मतांनी विजयी झाले आहेत. मांगुळकर यांना शेवटच्या फेरी अखेरीस ११७५०४ मते मिळाले तर भाजपचे उमेदवार मदन येरावार यांना १०६११३ मते मिळाली. वंचितच नीरज वाघमारे सुद्धा निवडणूक रिंगणात उभे होते. त्यांना ५४३२ मते मिळाली आहेत. 


दिग्रस मतदारसंघातून संजय राठोड पाचव्यांदा विजयी; काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचा २८ हजार ७७५ मतांनी पराभव
दिग्रस : दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार संजय राठोड हे २८ हजार ७७५ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांचा हा सलग पाचवा विजय आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. संजय राठोड यांना एक लाख ४३ हजार ११५ इतकी मते मिळाली. तर ठाकरे यांना एक लाख १४ हजार ३४० मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे नाजुकराव धांदे हे राहिले. त्यांना एक हजार ९८५ मते मिळाली, तर बसपाचे संदीप देवकते यांना ८४० मतांवर समाधान मानावे लागले. दिग्रसमधील या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते.


उमरखेडमध्ये भाजपचे किसन वानखेडे १६ हजार ६२९ मतांनी विजयी
उमरखेड : उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे किसन वानखेडे यांनी १६ हजार ६२९ मतांनी काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांचा पराभव केला. किसन वानखेडे यांना एक लाख आठ हजार ६८२ मते मिळाली. तर काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांना ९२ हजार ५३ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात मतदारांनी दोन्ही बंडखाेर माजी आमदारांना धूळ चारल्याचे दिसून येते. काँग्रेसचे बंडखोर विजय खडसे यांना अवघी दोन हजार ८८१ मते मिळाली, तर भाजपचे बंडखोर माजी आमदार राजेंद्र नजरधने हे मनसेकडून निवडणूक मैदानात होते. त्यांना सात हजार ६१ इतकी मते मिळाली आहेत.


पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक ९० हजार ७६९ मतांनी विजयी; दुसऱ्यांदा आमदार बनत विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष 
पुसद : पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार इंद्रनील नाईक यांनी ९० हजार ७६९ इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. इंद्रनील नाईक यांना एक लाख २७ हजार ९६४ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शरद मैंद यांना ३७ हजार १९५ मतांवर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैद्य राहिले. वैद्य यांना ३६ हजार ५७५ मते मिळाली. इंद्रनील नाईक सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची घोषणा होताच पुसद परिसरात महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.


आर्णीमध्ये भाजपचे राजू तोडसाम विजयी; जितेंद्र मोघे यांचा २९ हजार ३१३ मतांनी पराभव
आर्णी : आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपचे राजू तोडसाम पुढे होते. २७ व्या फेरीअखेर तोडसाम हे २९ हजार ३१३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार जितेंद्र मोघे यांचा पराभव केला. तोडसाम यांना एक लाख २७ हजार २०३ मते मिळाली. तर जितेंद्र मोघे यांना २७ हजार ८९० मतांवर थांबावे लागले. प्रहारच्या नीता मडावी तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना एक हजार ८०४, तर बसपाचे बबन सोयाम यांना १७०० मते मिळाली


भाजपचे प्रा. अशोक उईके यांची राळेगावमध्ये हॅटट्रीक
राळेगाव : राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून प्रचंड चुरस होती. २५ व्या फेरीपर्यंत ही चुरस कायम राहिली. अखेर भाजपचे उमेदवार माजी मंत्री प्रा. अशोक उईके यांनी या मतदारसंघात विजयाची हॅटट्रीक साजरी केली आहे. त्यांनी २८१२ मतांनी काँग्रेस उमेदवार माजी मंत्री वसंत पुरके यांचा पराभव केला. अशोक उईके यांनी एक लाख एक हजार ३९८ मते मिळाली. तर प्रा. वसंत पुरके यांना ९८ हजार ५८६ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे किरण कुमरे राहिले. त्यांना २९३८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार उद्धव टेकाम यांनी २८१६ मते घेतली. मनसे उमेदवार अशाेक मेश्राम पाचव्या क्रमांकावर राहिले. त्यांना २०२३ मते मिळाली, तर प्रहारचे अरविंद कुडमेथे सहाव्या क्रमांकावर फेकल्या गेले. त्यांना १६७१ मते मिळाली.


वणीमध्ये उद्धव सेनेचे संजय देरकर यांचा झेंडा; भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची हॅटट्रीक हुकली
वणी  : वणी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय देरकर २५ व्या फेरीअखेर १५ हजार ५६० मतांनी विजयी घोषित झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव केला. संजय देरकर यांना ९४ हजार ६१८ मते मिळाली, तर बोदकुरवार यांना ७९ हजार ५८ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर यांनी तिसऱ्या क्रमांकाचे २१ हजार ९७७ मते मिळविली. तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय खाडे यांना सात हजार ५४० मते मिळाली. कम्युनिस्ट पार्टीचे अनिल हेपट यांना तीन हजार ८७५, तर वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र निमसटकर यांना तीन हजार ६०५ मते मिळाली. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत संजीवरेड्डी बोदकुरवार हे विजयी झाले होते. मात्र यावेळी उद्धव सेनेच्या संजय देरकर यांनी त्यांची हॅटट्रीक हुकवली आहे.

Web Title: In 7 constituencies of Yavatmal, the power of Mahayuti! Alliance has five seats and Aghadi has two seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.