पुसद : पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार इंद्रनील नाईक यांनी ९० हजार ७६९ इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. इंद्रनील नाईक यांना एक लाख २७ हजार ९६४ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शरद मैंद यांना ३७ हजार १९५ मतांवर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे माधवराव वैद्य राहिले. वैद्य यांना ३६ हजार ५७५ मते मिळाली. इंद्रनील नाईक सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची घोषणा होताच पुसद परिसरात महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मोठे योगदान मानले जात आहे. राज्यात २८८ जागांपैकी एकटा भाजप १२९ जागांवर आघाडीवर आहे, शिंदेसेनेला ५७ जागेवर आघाडीवर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४१ जागांवर यश मिळाल्याचे दिसत आहे. तर त्यांची आघाडी महायुती २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, आणि महाराष्ट्र विधानसभेत आरामात बहुमताचा आकडा पार करेल. २०२४ लोकसभा निवडणूकीत भाजपने राज्यात २८ जागा लढल्या होत्या आणि त्यांना केवळ ९ जागा जिंकण्यात यश आलं होत. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेचे चित्र दिसत नाही हे महाराष्ट्राच्या विधानसभा निकालातून सिद्ध होत.