वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे : शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी जमा, पुसद उपविभागाला गती वाढविण्याच्या सूचना रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी येत्या जुलै अखेरपर्यंत भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आत्तापर्यंत भूसंपादनापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी रुपये जमा केले आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ही प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. त्यामुळे प्रशासनाला पुढील ६५ दिवसांत ११०० हेक्टरची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यादृष्टीने ९१ गावांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १० गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. सहा गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. त्यासाठी दोन तालुक्यांना २०० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना ३३ कोटींचे वितरण करण्यात आले. आता यवतमाळ तालुक्यातील पारवा, गोदनी, वडगाव, भोयर, बोथबोडन आणि तिवसा येथील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नवीन कायद्यानुसार ८० गावांतील भूसंपादन होणार आहे. यात दारव्हा, पुसद आणि उमरखेड उपविभागाचा समावेश आहे. तेथे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून अवार्ड घोषित करणे व मोबदला देण्याची प्रक्रिया बाकी आहे. जलदगतीने दोन तालुक्यात १५ कोटी वाचले जलदगतीने जमीन भूसंपादित करून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याने दोन तालुक्यात १५ कोटींचा निधी वाचला आहे. भूसंपादन प्रक्रिया करताना कुणालाही संशय आल्यास यवतमाळ एनआयसी डॉट ईनवर प्रसिद्ध केलेली माहती पाहता येणार आहे. ३६ किलोमीटरचा मार्ग मोकळा या रेल्वे मार्गासाठी ९१ गावांमधील ११०० हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे. त्यातील २१ गावांमध्ये अवार्ड घोषित करून ३४० शेतकऱ््यांची १७७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यामुळे ३६ किलोमीटरचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरिता भूसंपादनासाठी सर्वच विभागांची मदत घेतली जात आहे. पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी जुलै अखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहे. आमच्याकडून त्वरित काम पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. - सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी ,यवतमाळ ज्या कामाला पूर्वी तीन वर्ष लागायचे, ते काम १० महिन्यात पूर्ण केले. तसेच पारदर्शक व लोकाभिमुख काम करण्यावर भर दिला. थेट गावांत जावून नागरिकांना प्रमाणपत्र आणि धनादेश दिले जात आहे. - विजय भाकरे, भूसंपादन अधिकारी, यवतमाळ
जुलैपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे निर्देश
By admin | Published: May 28, 2017 12:43 AM