संघर्षाची व संवादाची यात्रा ही आमची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:54 PM2019-08-06T21:54:15+5:302019-08-06T21:54:47+5:30
पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दारव्हा येथील शिवाजी स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा तालुक्यात दाखल झाल्यानंतर बोरी आणि बोदेगाव येथे स्वागत झाले. सभेला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री डॉ. संजय कुंटे, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार, आमदार प्रवीण पोटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार अॅड. नीलय नाईक, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे उपस्थित होते.
विरोधक महाजनादेश यात्रेवर टीका करीत असले तरी यात्रा ही भाजपची परंपरा आहे. विरोधात असताना संघर्षाची आणि सत्तेत संवादाची यात्रा काढत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली. आम्ही मात्र ११ कोटींची कर्जमाफी दिली, १९२ कोटी पीक विमा आणि पाच हजार ७०० कोटींचे पीक कर्ज वाटप केले. यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी ९७ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले. वर्षभरात या मार्गाचा एक टप्पा सुरू करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी आमदार प्रवीण पोटे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महादेवराव सुपारे, डॉ. अजय दुबे यांनी विचार व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहणे यांनी आभार मानले. मंचावर भाजप-शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी मुख्यमंत्रीही फडणवीसच -संजय राठोड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड आवर्जुन उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन झाल्यानंतर एकमेव ना. संजय राठोड यांचेच मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त भाषण झाले. त्यांच्या भाषणालाही उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. राज्याचा पुढचा मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस होतील यात मला शंका वाटत नाही, अशा शब्दात ना. संजय राठोड यांनी विश्वास व्यक्त केला. पाच वर्षात मुख्यमंत्र्यांची समर्थपणे साथ मिळाली, त्यामुळे महसूल विभागात अनेक निर्णय घेता आले. मुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने अनेक प्रश्नांची सोडवणूक केल्याचेही ते म्हणाले.