राजेश कुशवाह ल्ल आर्णी दीनदुबळ्या कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी ते आयुष्यभर झटले. इतरांच्या समस्या सुटाव्या म्हणून एक-दोन नव्हे चक्क शंभरदा त्यांनी मोठी आंदोलने उभारली. आठ वर्षांचा तुरुंगवासही भोगला. मात्र इतरांसाठी झटणारा हा लढवैय्या आयुष्याच्या उत्तरार्धात कफल्लक जीणे जगत आहे. कॉम्रेड मारोतराव सोळंके (८३) यांच्या प्रेरक वाटचालीचा हा आढावा...आर्णीतील दगड फोडणाऱ्या गरीब वडार समाजात कॉम्रेड मारोतराव सोळंके जन्मास आले. गरिबांची वेदना संपावी हीच त्यांची बालपणापासूनची कळकळ. त्यातच भाकपसारख्या संघटनेचा त्यांना आधार मिळाला. कॉम्रेड डांगे यांच्या विचारांनी ते भारावले. अन् सुरू झाली आंदोलनांची मालिका. १९५८ मध्ये अरुणावती नदीला आलेल्या पुरामुळे अनेक जण बेघर झाले होते. पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यायचा, त्यांचे पुनर्वसन करायचे म्हणून गावपुढाऱ्यांनी वर्गणी केली. पण त्यातला बहुतांश वाटा पुढाऱ्यांनीच हडप केला. सोळंके यांनी मात्र रक्ताने सही करावी लागणाऱ्या संघटनेची शपथ घेतली होती. सहाजिकच त्यांचे रक्त खवळले. त्यावेळी आयुष्यातले पहिले आंदोलन त्यांनी उभारले. गोविंदराव बुचके, अॅड़ खडलिया, अॅड़ चौधरी हे तत्कालीन सामाजिक दृष्टी असणारी मंडळी त्यांच्या दिमतीला होती. तेव्हाचे महसूल मंत्री वसंतराव नाईक तर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. अन्यायाविरुद्ध भिरकावलेला पहिला दगड मारोतराव सोळंके आज आयुष्याच्या उत्तरार्धात आहेत. मात्र आपल्या संघर्षाचा संपूर्ण पट त्यांच्या डोळ्यापुढे जिवंत आहे. बालपणी आठव्या वर्गात असताना आंध्र पोलिसांकडून काकांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिला आणि जमादारालाच दगड मारून त्यांनी अन्यायाला पहिला छेद दिला. त्यांची हीच लढवय्यी मानसिकता त्यांना आयुष्यभर संघर्षरत राहण्यासाठी प्रेरित करीत आहे.
आंदोलनांचे शतक ठोकणारा लढवय्या कफल्लकच
By admin | Published: September 23, 2015 6:00 AM