यवतमाळ : जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वीरीत्या राबविण्यात नेत्यांना यश आले. त्यामुळे भाजपला कुठलीही संधी मिळाली नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेकडून कालिंदा पवार यांना संधी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले. जिल्हा परिषद सभागृहात सकाळी ११ वाजतापासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. महाविकास आघाडीकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामांकन आले. भाजपने नामांकन दाखल केले नाही. त्यामुळे ही निवड प्रक्रिया अविरोध झाली.दुपारी १ वाजतानंतर निवड झाल्याची औपचारिक घोषणा पीठासीन अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केली. महाविकास आघाडीचे समीकरण जुळू नये यासाठी उमरखेडमधून जोरदार फिल्डींग लावली होती. भाजपातील गटाने दोन दिवसात अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्नही केले. त्यात काँग्रेसच्या काही अंतुष्टांना ऑफर देण्यात आली. मात्र महाविकास आघाडी शेवटपर्यंत अभेद्य राहिल्याने भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. अध्यक्षपद हे दिग्रस विधानसभेतच जाणार यावर आधीच जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. कालिंदा पवार यांच्या नावाला दुजोरा मिळत गेला तर राष्ट्रवादीने उपाध्यक्षपदासाठी दावेदारी करीत क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांचे नाव पुढे केले. माजी मंत्री मनोहरराव नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांनी जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व दाखवून दिले. काँग्रेसलाही दोन सभापतीपद मिळणार आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे तीन पदे, काँग्रेसकडे दोन व राष्ट्रवादीला एक असे समीकरण आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजप शांत बसली असली तरी सभापती निवड प्रक्रियेत समीकरण बिघडविण्याचा मनसुबा आहे. समित्यांवरून अंतर्गत नाराजी झाल्यास ऐनवेळेवरच बंडखोराला ताकद देऊन महाविकास आघाडीत बिघाडी आणण्याचा छुपा अजेंडा राबविण्याच्या तयारीत आहे. जिल्हा परिषदेत भगवा फडकविण्यात वनमंत्री संजय राठोड यांना अखेर यश मिळाले. या निवड प्रक्रियेनंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. पहिल्यांदाच शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याचा आनंद ओसांडून वाहत होता. झेडपी आवारात शिवसैनिकांनी पेढे वाटून जल्लोष केला.जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या नव्या ईनिंगची सुरुवातजिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येथे कायम राहिली आहे. सर्वाधिक संख्याबळ असतानाही शिवसेनेला सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळात सत्तेच्या बाहेरच रहावे लागले होते. याची सल वनमंत्री संजय राठोड यांच्या मनात कायम होती. मात्र महाविकास आघाडीच्या रुपाने तयार झालेल्या समीकरणात जिल्हा परिषदेचा गड सर करणे शिवसेनेला सहज शक्य झाले. इतकेच नव्हे तर तीन महत्वाची पदे शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी वगळता प्रथमच दुसऱ्या पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेत बसविण्याचा बहुमान शिवसेनेला मिळाला आहे. आता आरोग्य व समाज कल्याण या खात्याचे सभापतीपदासाठी दावा शिवसेनेकडून केला जात आहे. विषय समित्या व सभापती निवड प्रक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदी सेनेच्या कालिंदा पवार, राष्ट्रवादीचे कामारकर उपाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:00 AM
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेकडून कालिंदा पवार यांना संधी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले. जिल्हा परिषद सभागृहात सकाळी ११ वाजतापासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. महाविकास आघाडीकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामांकन आले. भाजपने नामांकन दाखल केले नाही. त्यामुळे ही निवड प्रक्रिया अविरोध झाली.
ठळक मुद्देजिल्हा परिषद बिनविरोध : अखेर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन