बाभूळगाव : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या गेलेल्या रोख मदतीत घोटाळा झाला असून, त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी शेतकरी प्रकाश कांबळे यांनी तहसीलसमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले. मंगळवारी दुसऱ्या दिवशी त्यांना अनेक लोकांनी पाठिंबा दर्शविला. मात्र, प्रशासनाकडून हे उपोषण बेदखल आहे.ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही अशांनाही फळपिकांचे नुकसान झाल्याचे कागदोपत्री दाखवून मदत देण्यात आली. चुकीचे बँक खाते क्रमांक टाकून खऱ्या लाभार्थ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्यांनाच मदत देण्याची गरज होती. तसेच न करता निम्मे बटईने मदत देण्यात आल्याचा आरोप प्रकाश कांबळे यांनी केला आहे. एकाच घरात एकापेक्षा अधिक लोकांना हजारो रुपये वाटले गेले. दोन हेक्टरपर्यंत मर्यादा असल्याने फळ पिकांच्या नावावर एका शेतकऱ्याला ५०-५० हजार रुपये दिले गेले. खरा गरीब हाडाचा शेतकरी या मदतीपासून वंचित राहिला. त्याचे नुकसान झाल्याचे वास्तव असताना उघड झालेल्या मदतीच्या यादीमध्ये त्याचे नावच नाही. बाभूळगाव तालुक्यात २०१३-१४ मध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला. यात ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत वाटण्यात आली. आजही बळीराजा ‘माझे नाव आहे का जी यादीत’ अशी विचारणा बँकेकडे करतो आहे. शासनाकडून आता या शेतकऱ्यांची कशा प्रकारे दखल घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत घोळ
By admin | Published: September 23, 2015 6:05 AM