यवतमाळ - गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. या वाघिणीनं गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. तिनं आतापर्यंत 13 जणांचा जीव घेतला होता. वाघिणीला ठार केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा केला आहे.
नरभक्षक वाघिणीची अखेर शिकार; वन विभागाची कारवाई
टी-1 वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या 47 दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं. ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी केली आहे. काल रात्री टी-1 वाघिणीचा शोध सुरू होता. त्यावेळी ती शोध पथकाला दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली. त्यामुळे शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला. रात्री एकच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. आता वाघिणीचा मृतदेह नागपूरला पाठवण्यात आला आहे. टी-1 वाघिणीचे दोन बछडे आहेत. त्यांचं वय 11 महिने इतकं आहे. त्यांना शोधण्याचं आव्हान आता वन विभागासमोर असेल.
...जिथे केली वाघिणीनं पहिली शिकार तिथेच झाला तिचा अंत
टी-1 वाघिणीचं गोरेवाडा पशू बचाव केंद्रात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून अथक प्रयत्न सुरू होते. वाघिणीला पकडण्यासाठी मध्यप्रदेशातून चार हत्ती आणण्यात आले होते. परंतु ते हत्तीही उधळले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या एका पिसाळलेल्या हत्तीनेच महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. याशिवाय पाच शार्पशुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचाऱ्यांची फौज एवढेच नाही तर वाघिणीचा हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर, इटालीयन कुत्रे आणण्यात आले होते. परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. या शोध मोहिमेत लाखो रूपयांचा चुराडा झाला. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामी लागली. खासगी शिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली होती.
नरभक्षक वाघीण ठार, वाघाला ठार मारण्यासाठी 'हे' आहेत नियम
वाघिणीच्या दहशतीमुळे केलापूर, राळेगाव, कळंब तालुक्यातील शेतीची कामं जवळपास ठप्प झाली होती. या तालुक्यांमध्ये वाघिणीनं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पांढरकवडा वनविभागातील राळेगाव व पांढरकवडा वनपरीक्षेत्रात नरभक्षक वाघिणीची सर्वाधिक दहशत पाहायला मिळाली. सोयाबीनचे व कपाशीचे पीक शेतात असूनही ते काढण्यासाठी शेतात जायला कुणीही तयार नव्हतं. गावातील मजुरांना मजुरी मिळत नसल्यामुळे काही मजुरांनी गाव सोडून मजुरीसाठी दुसऱ्या गावाकडे धाव घेतली. लोणी, सराटी, बोराटी, भुलगड, खैरगाव, विहिरगाव, येडशी, तेजणी, जिरा, मिरा, सखी, झोटींगधरा, तेजनी आदी गावांमध्ये या नरभक्षक वाघिणीची चांगलीच दहशत होती.