Lok Sabha Election 2019; भाजप बंडखोरामुळे निवडणुकीत रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 09:02 PM2019-03-28T21:02:54+5:302019-03-28T21:04:38+5:30
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी केल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथे आता काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी केल्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथे आता काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
भाजपाचे पी.बी. आडे माघार घेतात का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यांच्या माघारीसाठी प्रयत्नही झाले. मात्र त्यांनी थांबण्यास नकार दिला. त्यांनी थांबू नये म्हणून त्यांना समाजातून सर्वच पक्षात विखुरलेल्या प्रमुख चेहऱ्यांकडून पाठबळही लाभले. त्यामुळेच आडे यांचे रिमोट भाजपा-शिवसेना युतीतील नेत्यांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे.
भाजपाचे बंडखोर पी.बी. आडे नेमके कुणासाठी फायद्याचे व कुणासाठी तोट्याचे यावर आता जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. बंजारा समाजाचे पाठबळ हा आडे यांचा एकमेव प्लस पॉर्इंट आहे. मात्र आडे केवळ समाजाच्या भरवशावर निवडून येणार कसे हासुद्धा प्रश्नच आहे. आडेंची उमेदवारी शिवसेनेच्या हक्कांच्या मतांना सुरुंग लावणारी ठरू शकते. कारण आडेंना मिळणारी मते ही शिवसेनेला मिळाली असती. ती मते काँग्रेसकडे वळली नसती. आडे नसते तर या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रवीण पवार यांना पसंती दर्शविली असती. मात्र बंजारा समाजाची बहुतांश मते आडेंच्या मागे राहू शकतात. या उलट काँग्रेसच्या मतांचे विभाजन करणारा कोणताही मोठा उमेदवार रिंगणात नाही. काँग्रेसची दलित, मुस्लीम, कुणबी, ओबीसी ही हक्काची व्होट बँक कायम आहे. कुणबी समाजाची मते काँग्रेस व शिवसेना या दोन उमेदवारांमध्ये विभागली जातील, असा अंदाज असला तरी प्रत्यक्षात ती शक्यता कमी आहे. कारण कुणबी समाजाला यावेळी नवा पर्याय निर्माण झाला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या बाजूने दिसणारे कुणबी समाजातील प्रमुख चेहरे आता काँग्रेसच्या रॅलीत सहभागी असल्याचे पहायला मिळत आहे. आडे नसते तर बंजारा समाजाची मते काँग्रेसकडे गेली असती हा शिवसेनेचा समज खोटा ठरण्याची दाट शक्यता आहे. एकूणच भाजपाच्या बंडखोरामुळे या लोकसभा मतदारसंघात रंगत निर्माण झाली आहे. ‘बुस्ट’ देणारे युतीतील नेते अखेरपर्यंत आडेंच्या मागे राहतात का यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.
२४ उमेदवार रिंगणात, दोन बॅलेट युनिट लागणार
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आता २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. गुरुवारी सात उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणातील उमेदवारांची संख्या २६ होती. २४ उमेदवारांमुळे दोन बॅलेट युनिट लागणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले.