Lok Sabha Election 2019; ईव्हीएमची संगणकाद्वारे सरमिसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 09:16 PM2019-03-28T21:16:12+5:302019-03-28T21:17:11+5:30
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात संगणकीय प्रणालीद्वारेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यांची सरमिसळ केली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात संगणकीय प्रणालीद्वारेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यांची सरमिसळ केली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी पत्रपरिषदेत दिली.
नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. आता निवडणूक रिंगणात २४ उमेदवार कायम आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षाचे तीन उमेदवार आहेत. जाहीर प्रचाराला सुरुवात झाली असून हा प्रचार ९ मार्चच्या सायंकाळी ६ वाजता बंद होणार आहे. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व विधानसभा क्षेत्रस्तरावर ईव्हीएम सरमिसळ करून पाठविण्यात आले आहेत. पुन्हा एकदा २९ मार्च रोजी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे द्वितीय सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे केले जाणार आहे.
आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठकही झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत असलेले कर्मचारी व सैनिकांसाठी पोस्टल बॅलेटची प्रक्रिया यावेळेस आॅनलाईनद्वारे केली जाणार आहे. इटीपीबीएस प्रणाली तयार केली असून या सॉफ्टवेअरमधून डाऊनलोड केलेल्या पोस्टल बॅलेटवरच कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. या बॅलेट आॅनलाईन जात असल्या तरी त्या पोस्टाद्वारेच स्वीकारण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेच्या दिवशी सकाळी ८ पर्यंत या पोस्टल बॅलेट प्राप्त होतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आचारसंहितेच्या अनुषंगाने पोस्टर बॅनर्स काढण्यात आले आहे. भिंतीवर केलेले २५० पेंटींग मिटविले आहे. तीन हजार ८१६ पोस्टर काढले, एक हजार ७४८ बॅनर काढण्यात आल्याची माहिती दिली. प्रत्येक उपविभागीय अधिकारी स्तरावर इव्हीएम ठेवण्यासाठी तात्पुरते स्ट्राँग रूम तयार केले आहे. त्यानंतर हे सर्व ईव्हीएम दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामात ठेवण्यात येणार आहे. तेथेच मतमोजणीची प्रक्रिया होईल, असेही सांगितले. माध्यम समितीच्या शिफारशीवरून पेड न्यूज संदर्भात काँग्रेसच्या उमेदवाराला नोटीस बजाविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
३५० रुपये कापण्याची केवळ अफवा
सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून मतदान न केल्यास बँक खात्यातील ३५० रुपये कापले जाईल, असा मॅसेज फिरत आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना विचारणा केली असता, ती एक अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.