लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धामणगाव रोड स्थित यवतमाळ सहकारी जिनिंगच्या तोट्याच्या व्यवहारावर आता अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनीही आक्षेप नोंदविला आहे. निर्धारित किंमतीपेक्षा कमी भावात होणाºया या व्यवहाराला सक्षम प्राधिकरणाकडे आव्हान देण्याचे निर्देश जिनिंगच्या संचालक मंडळाला देण्यात आले आहे.यवतमाळ सहकारी जिनिंगची आठ एकर जागा अवघ्या सात कोटीत विकण्याचे ठरले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी सिक्युरीटायझेशन अॅक्टमधील तरतुदीचा आडोसा घेत या जिनिंगच्या जागेचा लिलाव केला आहे. जिनिंगची जागा व तेथील मशीनरीजची एकूण किंमत सुमारे ११ कोटी रुपये निर्धारित केलेली असताना अवघ्या सात कोटीत ही जागा विकण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक बाजारभावानुसार या जागेची किंमत २४ कोटीपेक्षा अधिक असल्याचे येथील ‘दलाल स्ट्रीट’वरून सांगितले जाते. या किंमतीत ही जागा खरेदी करण्यास शहरातील अनेक नामवंत मंडळी तयार आहेत. मात्र या जागेचा लिलाव अतिशय छुप्या पद्धतीने केला गेल्याचा सूर आहे.२४ कोटींची जागा अवघ्या सात कोटीत विकण्याचा हा व्यवहार अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) राजेश डाबेराव यांनाही पटलेला नाही. म्हणूनच त्यांनी या प्रकरणात यवतमाळ सहकारी जिनिंगच्या संचालक मंडळाला सहकार कायद्याच्या कलम ७९ अन्वये नोटीस जारी केली आहे. तोट्यातील या व्यवहारामुळे सहकारी जिनिंगचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिनिंगच्या संचालक मंडळाने हा व्यवहार मान्य करू नये, तो होऊ देऊ नये व या व्यवहाराला कायदेशीरीत्या आव्हान द्यावे, अशी सूचना केली गेली आहे. सहनिबंधकांच्या या नोटीसमुळे आतापर्यंत तोट्यातील व्यवहारासाठी संमती देणाऱ्या जिनिंगच्या संचालकांची चांगलीच कोंडी झाली आहे. एकूणच तोट्यातील हा व्यवहार फिस्कटण्याची व बँकेला आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी पुन्हा जिनिंगच्या जागेचा मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार व स्पर्धा निर्माण करून लिलाव करावा लागण्याची चिन्हे आहेत. स्पर्धा झाल्यास जिनिंगच्या जागेचा जादा किंमतीत लिलाव होऊन जिनिंगला निश्चितच फायदा होईल, असे मानले जाते. या नोटीसमुळे जिनिंगचा हा व्यवहार वांद्यात सापडला आहे. त्याला स्थगनादेश मिळाल्याचीही चर्चा असली तरी बँकेने ही बाब नाकारली आहे. सिक्युरीटायझेशन अॅक्टमध्ये सहनिबंधकांना हस्तक्षेपाचे अधिकारच नसल्याचेही बँकेतून सांगण्यात आले.सहायक निबंधकांचे मध्यस्थीचे प्रयत्नसहनिबंधकांनी नोटीस बजावल्याने अडचणीत आलेल्या जिनिंगच्या या व्यवहारात काही मध्यम मार्ग सापडतो का या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे. त्यात एक सहायक निबंधक मध्यस्थाची भूमिका वठवित असल्याचेही बोलले जाते. त्यात या मध्यस्थाला यश येते का याकडे नजरा लागल्या आहेत.यवतमाळ सहकारी जिनिंगच्या जागेचा लिलाव बाजारभाव आणि निर्धारित रकमेपेक्षा कमी किंमतीत होत असल्याने सहकारी संस्थेचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिनिंगच्या संचालक मंडळाला नोटीस बजावून या तोट्यातील व्यवहाराला आव्हान देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.- राजेश डाबेराव,विभागीय सहनिबंधक(सहकारी संस्था) अमरावती.
यवतमाळ जिनिंग सौदा तोट्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 9:40 PM
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धामणगाव रोड स्थित यवतमाळ सहकारी जिनिंगच्या तोट्याच्या व्यवहारावर आता अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनीही आक्षेप नोंदविला आहे. निर्धारित किंमतीपेक्षा कमी भावात होणाºया या व्यवहाराला सक्षम प्राधिकरणाकडे आव्हान देण्याचे निर्देश जिनिंगच्या संचालक मंडळाला देण्यात आले आहे.यवतमाळ सहकारी जिनिंगची आठ एकर जागा अवघ्या सात कोटीत विकण्याचे ठरले आहे. जिल्हा मध्यवर्ती ...
ठळक मुद्देसहनिबंधकांचेही शिक्कामोर्तब : जिनिंग संचालकांना नोटीस, अपिलाचे निर्देश