इस्रोमध्ये चमकली महाराष्ट्रकन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:19 PM2020-09-26T17:19:25+5:302020-09-26T17:19:48+5:30
इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर स्पेस कॉम्पीटीशन’ आयोजित केली होती. इस्रोने दोन हजार २९८ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धकांचा समावेश असून त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ८१ मुली आहेत, हे विशेष.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्राच्या मातीत विचारांची ताकद आणि भवितव्याचा वेध घेण्याची क्षमता ठासून भरली आहे. त्याचाच वारसा सांभाळत येथील गुणवंत विद्यार्थिनींनी चक्क इस्रोच्या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांना मागे टाकत प्रगल्भ बुद्धिमत्तेचा परिचय दिला.
पुढच्या दोन दशकात अंतराळात कोणती आव्हाने येतील, असा प्रश्न उपस्थित करत इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर स्पेस कॉम्पीटीशन’ आयोजित केली होती. जुलैमध्ये झालेल्या या स्पर्धांचा निकाल निकाल शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.
विविध राज्यातील लाखो सहभागी विद्यार्थ्यांपैकी पाच गटातून इस्रोने दोन हजार २९८ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धकांचा समावेश असून त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ८१ मुली आहेत, हे विशेष. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, मुंबई-पुण्यासह चक्क पाटणबोरी, यवतमाळ, अकोला, तुकूम चंद्रपूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी या संशोधनात्मक स्पर्धेत यशश्री पटकावली.
यवतमाळातील तिघांची भरारी
इस्रोने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, क्विझ स्पर्धा घेतली. यात यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील रेड्डी कॉन्व्हेन्टची गौरी सुरेश रेड्डी, यवतमाळ येथील अॅग्लो हिंदी ज्युनिअर कॉलेजची श्रावणी संजय देशपांडे व नंदूरकर विद्यालयाचा देवांश गोपाल कदम या तिघांची उत्तम स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली. अंतराळातील प्रदूषण, तेथील संशोधन, भविष्यातील संधी आदी विषयांवर त्यांनी विचार मांडले.
यापूर्वी अंतराळ मोहिमांमध्ये देशा-देशात स्पर्धा होती. परंतु पुढच्या दोन दशकात खासगी कंपन्यांमध्ये अंतराळ मोहिमांची स्पर्धा दिसणार आहे. तेथील मौल्यवान धातू आणि खनिजे मिळविण्यासाठी आतापासूनच कंपन्या सरसावल्या आहेत. त्यातून अंतराळातील प्रदूषण वाढीसोबतच तेथील पर्यटनाच्या आणि शेतीच्या संधी कमी होतील, हा धोका मी माझ्या निबंधात वर्तविला.
- गौरी सुरेश रेड्डी, पाटणबोरी (विजयी विद्यार्थिनी)