लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी गेले आठ दिवस बाजारपेठेवर निर्बंध लावले गेले होते. रविवारी संपूर्ण संचारबंदी पाळल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम केले आहेत. सोमवारच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत हे निर्बंध राहतील. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवार सकाळी ९ वाजतापर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. मागील आठवड्यात निर्बंध घातल्यानंतरही कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या निर्बंधांना मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता हे आदेश शहरी व ग्रामीण भागासाठी ८ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान गेल्या आठवडाभरापासून यवतमाळसह सोळाही तालुका पातळीवर नागरिक स्वयंस्फूर्तपणे निर्बंधांचे पालन करताना दिसत आहे. यापूर्वी अत्यंत कठोर लाॅकडाऊनमधील नुकसान नागरिकांंनी सोसले आहे. त्यामुळे लाॅकडाऊन पेक्षा सध्याचे कठोर निर्बंध पाळून व्यवहार सुरळीत ठेवण्याकडे नागरिकांचा कटाक्ष आहे.
व्यापारी म्हणतात, दुकानांची वेळ वाढवा जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशा मर्यादित केल्या आहेत. मात्र यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुकानांच्या वेळा सायंकाळी ५ ऐवजी किमान ७ वाजतापर्यत वाढविण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. प्रामुख्याने शहरातील नोकरदार वर्ग हाच मोठा ग्राहक आहे. या मंडळींची कार्यालये सुरू राहणार आहे. त्यामुळे ५ वाजताच्यानंतरच त्यांना खरेदीसाठी वेळ राहणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दुकानांच्या वेळा ७ वाजतापर्यंत वाढविण्याची मागणी यवतमाळ शहरातील व्यापारी मंडळींनी केली आहे.