‘मेडिकल’च्या डॉक्टरांची आता नेत्र रुग्णांच्या घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:06 PM2018-09-14T22:06:20+5:302018-09-14T22:18:01+5:30
आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा वयोवृद्ध नेत्र रुग्ण उपचारासाठी घराबाहेर पडत नाहीत. अशा रुग्णांना दृष्टी देण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा वयोवृद्ध नेत्र रुग्ण उपचारासाठी घराबाहेर पडत नाहीत. अशा रुग्णांना दृष्टी देण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नेत्र रूग्णाने मेडिकलच्या पत्यावर पोस्टकार्ड पाठवून आपली माहिती दिल्यास त्याच्या घरी थेट तज्ज्ञ डॉक्टरांची चमू जाऊन उपचार करणार आहेत. यासाठी नेत्ररोग विभागाने मोबाईल युनिट तयार केले आहे. आतापर्यंत एक हजार तीन रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया केली.
‘मेडिकल’मधील नेत्ररोग विभाग पूर्णत: अद्ययावत करण्यात आला आहे. डॉ. सुधीर पेंडके यांनी विभागप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात येथील रुग्ण सेवेचा दर्जा उंचावला आहे. यवतमाळात डोळ््याच्या मागील नेत्रपटलाच्या (व्हेटीरो-रेटील युनिट) विकारावर उपचार होत नव्हते. यासाठी स्वतंत्र रेटीनल युनिट तयार केले आहे. डोळ््याच्या मागील पडद्याचा (रेटिना) एक्सरे घेण्यासाठी ओसीटी उपकरण घेतले आहे. आता रेटिनाच्या प्रत्येक भागाची पाहणी करून योग्य निदान व उपचार शक्य झाला आहे. डोळयाच्या रेटिनाचा आजार असलेल्या नेत्रहीन रुग्णांना दृष्टी देता येणे सहज शक्य झाले आहे. जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत आमुलाग्र बदल घडवून नेत्र रुग्णांच्या जीवनातील अंधार पूर्णत: दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मोतीबिंदूच्या एक हजार तीन शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. शिवाय विविध आजाराच्या तब्बल दोन हजार ८३७ शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. अत्याधुनिक तपासणी यंत्रणामुळे रुग्णांना आता नागपूर व इतर कु ठेही जाण्याची गरज नाही. इतकेच काय कमी वजनाच्या नवजात बाळाचीही ‘रेटीनोपॅथी आॅफ प्रिमॅच्युरिटी’ या आजाराची तपासणी करता येते. या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या दहा बाळांवर उपचार करून त्यांचे अंधत्व दूर केले आहे. नेत्र तपासणीसाठी ओसीटी या अत्याधुनिक उपकरणाचा वापर केला जात आहे. नेत्र रुग्णांना रेटीना तपासणीसाठी आठवड्यातील गुरूवार हा दिवस निश्चित केला आहे. काचबिंदू, तिरळेपणा या आजारावर हमखास उपचार केले जात आहे.
गरीब नेत्र रूग्णांवर उपचारासाठी मोबाईल युनिट तयार केले आहे. अतिदुर्गम भागात पोहोचण्यासाठी जिल्हा अंधत्व निवारण समितीची मदत घेतली जाईल. त्यानंतर लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच रुग्णावर उपचार होतील. मोबाईल युनिटमध्ये दोन तज्ज्ञ डॉक्टर असतील. फक्त रुग्णांनी ‘नेत्ररोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ’ या पत्त्यावर पोस्ट कार्ड पाठवून मदत घ्यावी.
- डॉ सुधीर पेंडके , नेत्ररोग विभाग प्रमुख,
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ