अविनाश साबापुरे/ यवतमाळ : मानुषी छिल्लर नावाच्या भारतीय तरुणीने यंदाचा ‘मिस वर्ल्ड’ खिताब जिंकून आणला. तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकुट चढविण्यात तिच्या दिलखेचक कपड्यांचा सिंहाचा वाटा होता. अन् हे झळाळते वस्त्र कसे असावे याचा निर्णय कुणी घेतला? यवतमाळच्या मुलीने..! हो, शिफा जलाल गिलानीने.
यवतमाळचे प्रसिद्ध असामी जानमहंमद गिलानी यांची ही नात. तर जलाल आणि मुनिझा गिलानी यांची ती लाडकी लेक. यवतमाळच्या महिला विद्यालयात, सेंट अलॉयसियसमध्ये शिफाने प्राथमिक शिक्षण घेतल्यावर पाचगणीच्या संजीवन विद्यालयात, नागपूरच्या सेंटर पॉर्इंट स्कूलमध्ये ती शिकली. सुंदर दिसणारे जग अधिक सुंदर कसे करता येईल, हा शिफाचा ध्यास तिला फॅशन जगताकडे खेचत होता. म्हणूनच सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन येथून शिफाने फॅशन कम्युनिकेशन विषयाची पदवी मिळविली. अलिकडेच लंडन कॉलेज आॅफ फॅशनमधून शिफाने फॅशन मिडिया प्रॉडक्शनची पदव्यूत्तर पदवी प्राविण्यासह मिळविली आहे. यवतमाळची शिफा मुंबईत स्थायिक झाली असली, तरी ती म्हणते, ‘यवतमाल मेरा घर हैं और वो घरही रहेगा..!’कपडो से टॅलेन्ट झलकता हैं..!बौद्धिक झेप, निर्णय क्षमता, स्वभाव या व्यक्तिमत्त्वाच्या या विविध पैलूंचा ‘देखावा’ न होता ते ‘प्रेक्षणीय’ व्हावे यासाठी योग्य वस्त्रप्रावरणे महत्त्वाची ठरतात. मानुषीसाठी तेच काम शिफाने केले. ती म्हणते, कपडो का बहोत इम्पॉर्टन्स होता हैं. मानुषी के लिए बेहतर से बेहतर डिझाईन देने की हम ने कोशीश की. मानुषी खुद भी एक ‘चूझर’ हैं. कपडों की उसे सुझबूज हैं. कपडो से आपका मूड, आपका टॅलेन्ट भी झलकता हैं..!अपसाईड डाउन.. होल वर्ल्डशिक्षणात वेगळी वाट चोखाळणारी शिफा गिलानी आगळ्या वेगळ्या यशाची धनी झाली आहे. जगापेक्षा वेगळे काहीतरी करणारी शिफा आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेट्समध्ये लिहिते...अपसाईड डाउन होल वर्ल्ड.. म्हणजे संपूर्ण जगात उलथापालथ! अन् तिच्या कामगिरीने ही उलथापालथ प्रत्यक्ष घडवून आणली. तब्बल १७ वर्षानंतर मिस वर्ल्डचा खिताब भारतात आला.