धक्कादायक! सकाळी चहाच्यावेळीच मिळणार दारूचा पौवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:07 PM2018-11-13T17:07:53+5:302018-11-13T17:10:17+5:30
दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.
विनोद ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. आता दारूबाजांना सकाळी चहाच्यावेळी दारूचा घोटसुद्धा मिळण्याचा मार्ग शासनाने खुला करून दिला आहे.
एखाद्या आजाराने किंवा साथीने जीतक्या व्यक्तींचा मृत्यू होतो, त्यापेक्षा कित्येक पटीने दारूच्या सेवनाने मृत्यू होत असल्याचे वास्तव आहे. दारूच्या व्यसनापायी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यातील महिलांना याची मोठी झळ बसत आहे. म्हणूनच संपूर्ण राज्यातच दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. शासनाने वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. मात्र याच तिनही जिल्ह्यात सर्वाधिक अवैध दारूविक्री सुरू आहे. दारू तस्करांची हिंमत शिगेला पोहोचली आहे. शासन व प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे दारू तस्करांचे जाळे विणले जात आहे. छत्रपती चिडे हे पोलीस अधिकारी या धोरणाचा बळी ठरूनही शासनाने आपल्या दारूविषयक उदार धोरणात बदल घडविण्यास पुढाकार घेतलेला दिसत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने राज्य महामार्गालगतची बंद करण्यात आलेली दारू दुकाने हळूहळू कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुरू होऊ लागली आहे. तर दारू दुकाने सुरू राहण्याची वेळ वाढवून शासनाने आपले उदार धोरण पुन्हा जाहिर केले आहे. यापूर्वी दारूची दुकाने सकाळी १० वाजता उघडायची व रात्री १० वाजता बंद व्हायची. आता शासनाच्या गृह विभागाने ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून दारू दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजता केली आहे. त्यामुळे दारू शौकीनांना सकाळी चहा पिण्याऐवजी दारूचा घोटच घेणे शक्य झाले आहे.