यवतमाळात टोळी युद्धाचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:25 PM2018-07-15T23:25:14+5:302018-07-15T23:25:39+5:30
शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील जामनकर नगर, आठवडीबाजार परिसरात शनिवारी टोळी युद्धाचा भडका उडाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून अवधूतवाडी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.
कुख्यात बाबा पवार याचा भाचा विजय रमेश चव्हाण (१९) रा.जांब रोड याच्यावर विरोधी गटातील सहा जणांनी तलवार व लोखंडी रॉडने जामनकरनगर परिसरात शनिवारी दुपारी प्राणघातक हल्ला केला. विजय हा त्याचा मित्र टिकू राठोड याला भेटण्यासाठी दुचाकीने जात होता. या हल्ल्यात विजय आणि रवी जखमी झाले. त्यांनी तेथून पळ काढत अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी विजय चव्हाण याच्या तक्रारीवरून रौनक यादव (२०) रा.जामनकरनगर, मिट्टू ठाकूर (२५), आदित्य यादव (२१), विजय कैथवास (२२), सोनू ठाकूर ऊर्फ संडास (२१) तिघेही रा.आठवडीबाजार, शाहरूख पठाण रा.कळंब चौक यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तर विरोधी गटातील रौनक यादव (२०) रा. जामनकरनगर याची आई निता राजेश यादव यांच्या तक्रारीवरून रवी पवार (२०), सोनू पवार (२१) दोघेही रा.आठवडीबाजार, विक्की कापसे (२२), सचिन राठोड (२३) दोघेही रा.जामनकरनगर, विजय रमेश चव्हाण रा.जांब रोड, सागर शिंदे रा.कार्ली यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. परस्परविरोधी तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी प्राणघातक हल्ला, जबर मारहाण, धमकी देणे, दंगा घडवून आणणे व शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर यादव टोळीतील सर्व सदस्य पसार झाले. तर विजय चव्हाण हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला असता त्याला तेथेच साथीदारासह पोलिसांनी अटक केली. या दोन्ही गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. पोलिसांच्या भूमिकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
नवोदितांचा वापर
शहरात राजकीय पाठबळामुळे स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी काही घटकांकडून नवोदितांचा वापर केला जात आहे. १८ ते २५ वयोगटातील तरूणांना हाताशी धरून त्यांची आक्रमकता स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी वापरली जात आहे.
तक्रार घेऊन आलेल्या चौघांना अटक
तक्रार देण्यासाठी आलेल्या विजय रमेश चव्हाण, सचिन छगन राठोड, रवी गजानन पवार, शुभम सुधाकर कापसे या चौघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना एक दिवसाची कोठडी देण्यात आली.