आर्णी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवस कापसाच्या गाड्या वजनासाठी ताटकळत असल्याने आणि त्यातच आज कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी पडले. त्यामुळे तीव्र असंतोष निर्माण होवून शेतकऱ्यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन करून मार्ग रोखून धरला. सलग दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने यावेळी बाजार समितीसह पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिके शेतकऱ्याच्या हातून गेली. त्यामुळे शेतकरीवर्ग आधीच आर्थिक विवंचनेत आहे. असे असताना थोड्याफार प्रमाणात कापूस घरात आला. आता आर्थिक नड भागविण्यासाठी हा कापूस बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जात आहे. आर्णी तालुक्यातील शेवटच्या टोकापासून येथील बाजार समितीत कापूस विक्रीसाठी येतो. त्यामुळे येथील बाजार समितीत कापसाच्या गाड्यांची रांगच रांग असते. कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंगची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना तीन-तीन दिवस ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांच्या जनावरांचीही उपासमार होत आहे. कडाक्याच्या थंडीची झळही त्यांना सोसावी लागत आहे. त्यातच आज कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी पडले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी दुपारी नवीन बाजार समितीसमोर चक्काजाम करीत रस्ता रोखून धरला. यावेळी प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेत तेथे धाव घेतली. बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण मुनगिनवार, रवी राठोड, प्रकाश सरोदे, तायडे आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणखी दोन जिनिंग सुरू करून शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (तालुका प्रतिनिधी)
आर्णीत दुसऱ्या दिवशीही चक्काजाम
By admin | Published: January 22, 2015 2:15 AM