नको देवराया, अंत आता पाहू
By admin | Published: July 5, 2015 02:30 AM2015-07-05T02:30:13+5:302015-07-05T02:30:13+5:30
गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेले शेतकरी धास्तावले आहे.
शेतकऱ्यांची आर्त विनवणी : पाऊस हरविल्याने शेतकरी धास्तावला
स्वप्नील कनवाळे पोफाळी
गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेले शेतकरी धास्तावले आहे. दररोज आकाशाकडे पाहून निराश होत आहेत. पावसाचा पत्ताच नसल्याने आता शेतकरी ‘नको देवराया अंत आता पाहू’ असेच म्हणत आहेत. वेळेत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळणार हे निश्चित.
मृगाच्या पावसात पेरणी झाल्याने सध्या पीक डोलू लागले आहे. परंतु पावसाचा पत्ता नसल्याने पावसा अभावी सोयाबीन आणि पऱ्हाटीची झाडे माना टाकत आहेत. गत काही वर्षाचा अनुभव पाहता पुन्हा दुबार पेरणीचे संकट येईल काय, अशी धास्त शेतकऱ्यांना आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून बियाणे, खते विकत घेतली, मशागत करून पेरणीही केली. पुरेसा पाऊस झाल्याने शेत हिरवेगार झाले. पिके वाऱ्यासंगे डोलू लागली होती. परंतु दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैरान झाले आहे. उन्हाळ््यासारखी दाहक ऊन्ह तापत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसावरच आतापर्यंत पीक तरली आहेत. परंतु आता काही शेतातील पीक माना टाकत आहेत. एक-दोन दिवस पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट घोंघावणार आहे. दुबार पेरणीसाठी पैसे आणावे तरी कोठून, असा प्रश्न पडला असून, आता देवाचीच करूणा भाकली जात आहे.