यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:23 PM2020-01-13T13:23:54+5:302020-01-13T13:25:01+5:30
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच निश्चित झाले. अध्यक्षपद शिवसेनेच्या तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून कालिंदा पवार (ता. दारव्हा) तर उपाध्यक्ष पदासाठी बाळापाटील कामारकर (ता. पुसद) यांनी नामांकन दाखल केले. महाविकास आघाडीकडे एकूण ४३ सदस्य संख्या आहे. त्यामध्ये शिवसेना २०, काँग्रेस १२ तर राष्ट्रवादीच्या ११ सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार मदन येरावार व जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या उपस्थितीत भाजपच्या १८ सदस्यांचीही बैठक सुरू आहे. भाजपनेही काँग्रेसला अध्यक्ष पदाची ऑफर देऊन सत्तेचे वेगळे गणित मांडण्यासाठी साकडे घातले होते. परंतु काँग्रेसने महाविकास आघाडीतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दुपारी ३ वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली आहे.