रस्ता दुरुस्तीची अजब तऱ्हा, नव्यापेक्षा होता जुनाच बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 04:36 PM2021-12-13T16:36:16+5:302021-12-13T16:54:21+5:30
दारव्हा नाक्याकडून सुभाषनगरकडे जाणारा रस्ता खूप खराब झाला आहे. काही दिवसांपूर्वी या भागात सांडपाण्याचा तलाव तयार झाला होता. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून तयार केलेला रस्ता आज धोक्याची घंटा देत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बांधकाम क्षेत्रात दीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या कंत्राटदारांकडूनही कशी अजब कामे केली जातात, याचा उत्कृष्ट नमुना यवतमाळात पाहायला मिळतो. खड्डे बुजविताना ते जुन्या रस्त्याशी समांतर व्हावे, हा सरळ नियम मानता येईल. मात्र, येथे होत असलेली कामे लोकांसाठी डोकेदुखीच नव्हे तर जीवघेणीही ठरू पाहत आहे.
येथील संकटमोचन रोडवर पाईपलाईनसाठी खोदलेला रस्ता बुजविताना करण्यात आलेले काम अजब कामाचा उत्कृष्ट नमुना मानता येईल. याच भागात नव्हे तर शहरात इतर ठिकाणीही होत असलेली कामे अशाच पद्धतीने सुरू आहे. यावर प्रशासनाचे नियंत्रण आहे की नाही, याविषयी शंकेला वाव आहे.
डांबरीकरण झालेल्या रस्त्याला काँक्रिटची जोड
- माईंदे चाैक रस्त्याच्या बाबतीत लाेकांची मोठी ओरड आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी केलेले खोदकाम बुजविण्यासाठी काँक्रिट करण्यात आले. जुन्या रस्त्यापेक्षा दोन ते तीन इंच उंच डागडुजी करण्यात आली आहे.
- दारव्हा नाका ते एमआयडीसी चाैकापर्यंत करण्यात आलेली डागडुजीही वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. मोठमोठे खड्डे असलेल्या ठिकाणी टाकलेल्या गिट्टीवर बारीक गिट्टी टाकण्यात आली. मूळ रस्त्यापेक्षा डागडुजी झालेला भाग खाली आहे. आता तर बारीक गिट्टीही रस्त्यावर पसरली असल्याने वाहने घसरून पडत आहेत.
थातूरमातूर कामामुळे अधिकाऱ्यांनाही त्रास
- यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ केलेले खोदकाम थातूरमातूर बुजविण्यात आले. ओबडधोबड डांबरीकरण करून वेळ मारून नेण्यात आली.
- दारव्हा नाक्याकडून सुभाषनगरकडे जाणारा रस्ता खूप खराब झाला आहे. काही दिवसांपूर्वी या भागात सांडपाण्याचा तलाव तयार झाला होता. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून तयार केलेला रस्ता आज धोक्याची घंटा देत आहे.
- विश्रामगृह ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारा रस्ता कधी चांगला होईल, याची नागरिकांना दीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे.