उमरखेडमध्ये पार्किंग समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:45 AM2017-11-06T00:45:24+5:302017-11-06T00:45:55+5:30
शहराच्या विस्ताराबरोबर व्यापारी संकुलाचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. अगदी वर्दळीच्या आणि राज्य मार्गावर मोठमाठी व्यापारी संकुले उभी राहिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहराच्या विस्ताराबरोबर व्यापारी संकुलाचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. अगदी वर्दळीच्या आणि राज्य मार्गावर मोठमाठी व्यापारी संकुले उभी राहिली. परंतु बांधकाम करताना कुणीही पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष दिले नाही. अशीच अवस्था शहरातील इतर प्रतिष्ठानांचीही आहे. त्यामुळे शहरात पार्किगची समस्या गंभीर झाली आहे. यामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडत आहे. नगरपालिकेसह वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत आहे.
उमरखेड शहरातील रस्ते आधीच लहान आहेत. त्यातच या रस्त्यालगत व्यापारी संकुले निर्माण झाली आहे. विविध दुकाने असल्याने या परिसरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. अलिकडे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. ग्राहक आपल्या वाहनाने दुकानात येतात. परंतु वाहन उभे कुठे करावे, असा प्रश्न असतो. एखाद्या दुकानात खरेदीसाठी जायचे असल्यास पहिला प्रश्न वाहन पार्किंगचाच येतो. अनेकदा नागरिक रस्त्यावर वाहने पार्किंग करून दुकानात जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशातच एखादे अवजड वाहन आल्यास तानस्तास वाहतूक खोळंबते. वाहनाच्या रांगा लागतात. काही जण कर्णकर्कश हॉर्न वाजवितात.
उमरखेड नगरपालिका व काही खासगी व्यक्तींचे व्यापारी गाळे आहे. या संकुलाचे बांधकाम थेट रस्त्यापर्यंत आले आहे. खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. तसेच शहरातील बसस्थानक ते माहेश्वरी चौकापर्यंत दोनही बाजूने रस्त्यावरच फळांचे व इतर विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या असतात. हा सर्व प्रकार नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. पुसद मार्गावरील स्टेट बँक आॅफ इंडिया, गांधी चौकातील ग्रामीण बँक, बसस्थानकासमोरील महाराष्टÑ बँक, सेंट्रल बँक या सर्व बँका खासगी इमारतीमध्ये सुरू आहे. बँकेत येणारे सर्व ग्राहक रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करतात. त्यामुळे या रस्त्यावरून साधी रिक्षाही जाऊ शकत नाही. काही ठिकाणी तर व्यापारी संकुलाच्या पायºया थेट डांबरी रस्त्यापर्यंत आल्या आहेत.
शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. मनमानेल त्या पद्धतीने वाहने उभी असतात. वाहतूक पोलीसही गांभीर्याने हा विषय घेत नाही.
वाहतूक पोलीस नावालाच
उमरखेड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौकाचौकात वाहतूक शिपायांची नियुक्ती केलेली असते. माहेश्वरी चौक, गांधी चौक, नाग चौक, पुसद रोड, ढाणकी रोड, महागाव रोड या भागात पोलीस कधीच आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर कधी तरी पोलीस धावून येतात. तोपर्यंत नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागतो.