कोरोना रुग्ण वाढताना ‘प्लाझ्मा’ची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:06+5:30
दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. आता शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची तपासणी होत असल्याने त्यातूनही ही बाब अधोरेखित होत आहे. मात्र शहरातील चारपैकी केवळ शासकीय रक्तपेढीकडेच आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध आहे. या रक्तपेढीकडे आतापर्यंत २६ बॅग प्लाझ्मा उपलब्ध होता. त्यापैकी काहींचे वितरण झाल्याने सध्या केवळ आठ बॅग शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनलॉक प्रक्रियेनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र जिल्ह्यात त्या प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध नाही. शासकीय रक्तपेढीकडे आजमितीस केवळ आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. आता शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची तपासणी होत असल्याने त्यातूनही ही बाब अधोरेखित होत आहे. मात्र शहरातील चारपैकी केवळ शासकीय रक्तपेढीकडेच आठ बॅग प्लाझ्मा उपलब्ध आहे. या रक्तपेढीकडे आतापर्यंत २६ बॅग प्लाझ्मा उपलब्ध होता. त्यापैकी काहींचे वितरण झाल्याने सध्या केवळ आठ बॅग शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. या आठ बॅगमध्ये चार बॅग बी पॉझिटिव्ह, दोन बॅग ओ पॉझिटिव्ह आणि दोन बॅग बी निगेटीव्ह गटाच्या असल्याचे सांगण्यात आले. शहरातील उर्वरित तीन खासगी रक्तपेढ्यांकडे प्लाझ्मा नाही. विशेष म्हणजे, या पेढ्यांना प्लाझ्मा गोळा करण्याचे अधिकारही नाही. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यात दाहक परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहे.
कोरोना प्लाझ्मा गोळा करण्याचे अधिकार खासगी रक्तपेढ्यांना नाही. केवळ शासकीय रक्तपेढी हा प्लाझ्मा गोळा करू शकते. मात्र आता रक्ताची मागणी वाढत असून संकलन कमी आहे. त्यासाठी शासनाने आवाहन करण्याची गरज आहे.
- सागर तोडकर, एकनील रक्तपेढी
कोण देऊ शकतो प्लाझ्मा?
पॉझिटिव्ह व्यक्ती उपचारानंतर बरी झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा देऊ शकतो. प्लाझ्मा देण्यासाठी त्या व्यक्तीची हिमोग्लोबीनची पातळी चांगली असावी लागते.
प्लाझ्मा दान करण्यासाठी अन्टीबॉडी टेस्ट आणि प्लाझ्मा संकलित करण्यासाठी
तीन तासांचा कालावधी लागतो.