राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपीला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. उलट हा आरोपी गावात येऊन ‘अटक तर होणारच नाही, पोलिसांना आपण सापडूच शकत नाही, आणखी दोघे-तिघे आपल्या निशाण्यावर आहेत’ अशा वल्गना करून गावकऱ्यांना अप्रत्यक्ष धमक्या देत आहे.सहायक फौजदार राजेंद्र कुडमेथे (रा. वणी) यांच्या खुनाच्या घटनेवरून (२५ नोव्हेंबरची मध्यरात्र) १७ दिवस लोटले आहे. मात्र अद्याप पोलिसांना यातील आरोपी अनिल मेश्राम (रा. हिवरी ता. मारेगाव) याचा थांगपत्ता लागलेला नाही. आठवडाभर अडीचशे पोलिसांची फौज मारेगावच्या जंगलात तैनात करण्यात आली होती. पोलीस पथके चंद्रपूर-तेलंगणापर्यंत जाऊन आली. मात्र आरोपीचा शोध लागला नाही. या आरोपीला अटक करावी म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनावर मुंबईतून राजकीय व प्रशासकीय दबाव वाढतो आहे. पोलिसाचा मारेकरी अजून का सापडला नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना पोलीस महासंचालकांना निरुत्तर व्हावे लागत आहे. जंगलातील फौज हटविली गेली असली तरी मारेगाव व यवतमाळातील विशेष पोलीस आरोपीच्या मागावर आहे. परंतु या पोलिसांना हुलकावणी देऊन आरोपी सर्रास भरदिवसा गावात येऊन निघून जात आहे.शनिवारी ८ डिसेंबर रोजी आरोपी अनिल सकाळी ८.३० वाजता गावात येऊन गेला. घरी त्याने आजी, बहीण यांच्या भेटी घेतल्या व काही वेळानंतर पुन्हा जंगलाकडे निघून गेला. त्यानंतरही तो दोन वेळा गावात येऊन गेल्याचे सांगितले जाते. पोलीस पथक हे आरोपी, त्याचे घर व गावावर वॉच ठेऊन असताना आरोपी येऊन निघून जातो कसा हे कोडेच आहे. तो गावात लोकांशी संवाद साधतो, त्याचे हे बोलणे पोलिसांपर्यंत पोहोचते. अलिकडेच त्याने गावातील काहींना सांगितले की, मी अटक होणारच नाही, आपण पोलिसांच्या हाती लागूच शकत नाही, मात्र आणखी दोन-तीन जणांचा मुडदा पाडायचा आहे. ही चर्चा पोलिसांपर्यंत पोहोचली. यावरून आरोपीला पश्चाताप नसल्याचे स्पष्ट होते. त्याने यापूर्वी आपल्या विरोधात घरात घुसून मारहाण व विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेलाही अशीच जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती महिला जीवाच्या भीतीने गाव सोडून इतरत्र आश्रयाला गेली.गेल्या दोन आठवड्यातील आरोपीच्या गावातील येरझारा पाहता तो दूर कुठे गेलेला नाही, गावाच्या आजूबाजूलाच कुठे तरी आहे, गुराखी असल्याने संपूर्ण जंगलाचा त्याला अभ्यास आहे, त्याचाच फायदा तो फरार राहण्यासाठी घेतो आहे, अशा निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. हिवरीच्या परिसरात अनेक पोड आहेत. कदाचित तेथेच हा आरोपी आश्रय घेत असावा, असा संशय पोलिसांना आहे. या आरोपीची गावात दहशत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकच नव्हे तर शासकीय घटकही पोलिसांना त्याच्याबाबत माहिती देणे टाळतात. पोलिसांना गावातून सहकार्य मिळत नसल्यानेच आरोपी बिनधास्त गावात येऊन पोलिसांना हुलकावणी देत निघून जात असल्याचे सांगितले जाते.आरोपीकडे मोबाईल नसल्याने पोलिसांची अडचणकोणत्याही गुन्ह्यातील आरोपी शोधायचा असेल तर पोलीस सर्वप्रथम त्याच्या मोबाईल लोकेशनवर लक्ष केंद्रीत करतात. आरोपींच्या अटकेत मोबाईलची खूप मोठी मदत पोलिसांना मिळते. परंतु मारेगावातील सहायक फौजदाराच्या खुनात मोबाईलची ही मदत पोलिसांना मिळणार नाही. कारण आरोपी मोबाईल वापरत नाही. त्यामुळेच आरोपीचे लोकेशन मिळविताना पोलिसांची दमछाक होत आहे. यावरून अन्य बहुतांश गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेत मोबाईलचेच खरे ‘श्रेय’ किती मोठे असते हे लक्षात येते. अनेक आरोपी नातेवाईकांकडे आश्रयाला जातात. मात्र आरोपी अनिलच्या स्वभावामुळे नातेवाईक त्याला जवळ करीत नसावे किंवा तो नातेवाईकांकडे जात नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळेच नातेवाईकांकडूनही पोलिसांना अनिलचा कोणताच ‘क्ल्यू’ अद्याप मिळालेला नाही. मात्र पोलीस त्याच्या मागावर आहेत. लवकरच तो गजाआड होईल, असा विश्वासही व्यक्त करीत आहे. यापूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यानंतर तो तीन ते चार महिने घराकडे फिरकलाच नव्हता, हे विशेष.
पोलिसाच्या मारेकऱ्याची गावकऱ्यांना धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 9:38 PM
मारेगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपीला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. उलट हा आरोपी गावात येऊन ‘अटक तर होणारच नाही, पोलिसांना आपण सापडूच शकत नाही, आणखी दोघे-तिघे आपल्या निशाण्यावर आहेत’ अशा वल्गना करून गावकऱ्यांना अप्रत्यक्ष धमक्या देत आहे.
ठळक मुद्देम्हणे, अटक तर होणार नाहीच : आणखी दोघे-तिघे निशाण्यावर, पोलिसांना हुलकावणी देत भरदिवसा गावात एन्ट्री!