लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अधिक महिन्यामुळे यावर्षी गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात असला तरी निवडणुकांचे वर्ष असल्याने खबरदारी म्हणून पोलीस आतापासूनच तयारीला लागले आहे. त्या अनुषंगाने क्रियाशील व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.१३ सप्टेंबरपासून राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर लगेच नवरात्र-दुर्गोत्सव येईल. दिवाळीनंतर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहणे सुरू होईल. निवडणुकीचे वर्ष, हिंदुत्ववादी संघटनांचा जोर, अल्पसंख्यांकमध्ये असुरक्षिततेची भावना आदीबाबींमुळे पोलिसांना सतत दक्ष राहावे लागणार आहे. म्हणूनच पोलीस सण-उत्सवाची आतापासूनच पूर्व तयारी करीत आहे. गणेशोत्सवाला अद्याप दोन महिने अवधी असला तरी पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. क्रियाशील गुन्हेगारांची स्वतंत्र कुंडली तयार केली जात आहे. यापूर्वी दंगलीचा इतिहास असलेल्या आरोपींकडून चांगल्या वर्तवणुकीचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. शिवाय क्रियाशील गुंडांवर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. मालमत्ता व दुखापतीचे गुन्हे असलेल्यांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहे. हे प्रस्ताव एसपींमार्फत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले जातील. तीन ते चार गुन्हे शिरावर आहे, बॉन्ड देऊनही वर्तवणूक सुधारत नाही, अशांना तडीपार केले जाणार आहे. गावठी व मोहाची दारू गाळणाºयांना एमपीडीए अंतर्गत कारागृहात सहा महिन्यांसाठी स्थानबद्ध केले जाणार आहे. वारंवार कारवाई करूनही व बॉन्ड देऊनही त्यांचे दारू गाळणे सुरूच असल्याने ही कारवाई केली जाणार आहे. या संबंधीचे प्रस्ताव बहुतांश पोलीस ठाण्यात तयार केले जात आहे. या संबंधी २९ जून रोजी झालेल्या क्राईम मिटींगमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सर्व ठाणेदारांना सूचना दिल्या होत्या.दोन नवे पोलीस निरीक्षक येणारपोलीस निरीक्षक करीम मिर्झा सेवानिवृत्त झाल्याने यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार पद रिक्त आहे. याशिवाय जिल्हा वाहतूक शाखा, कळंब पोलीस ठाणे एपीआयद्वारे चालविले जात आहे. तेथेसुद्धा निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमला जाण्याची शक्यता आहे. या महिन्याअखेरीस घाटंजी पोलीस ठाणेसुद्धा रिक्त होत आहे. तेथील निरीक्षक भावसार जुलै अखेर निवृत्त होणार आहे. बाळकृष्ण जाधव व प्रदीप शिरसकार हे दोन नवे पोलीस निरीक्षक जिल्ह्यात येत आहे. जाधव हे यापूर्वी वडगाव रोडला ठाणेदार होते. ते आता कोकणातून बदलून येत आहे. तर शिरसकार चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशाह येथे नेमणुकीस होते. हे दोन अधिकारी रुजू झाल्यानंतर यवतमाळ ग्रामीण, ट्रॅफिक, कळंब येथे फेरबदल होण्याची शक्यता पोलीस दलात वर्तविली जात आहे.एसडीपीओंची प्रतीक्षापुसदचे सहायक पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या बदलीची शक्यता आहे. कारण त्यांच्या जागेवर नाशिक येथील राजू भुजबळ यांची पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अद्याप ते रुजू झाले नाही. त्यांच्या रुजू होण्याबाबत पोलीस दलात साशंकताही व्यक्त केली जात आहे. जिल्हा पोलीस दलाला गृहपोलीस उपअधीक्षक नाही. हे पद रिक्त असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे.
पोलीस लागले गणेशोत्सवाच्या तयारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 9:14 PM
अधिक महिन्यामुळे यावर्षी गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात असला तरी निवडणुकांचे वर्ष असल्याने खबरदारी म्हणून पोलीस आतापासूनच तयारीला लागले आहे. त्या अनुषंगाने क्रियाशील व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
ठळक मुद्देप्रतिबंधात्मक कारवाईवर भर : क्रियाशील गुंडांची बनतेयं ‘कुंडली’