डाक खात्यातील ‘नागरिक वचन पत्र’ ठरले थोतांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:16 PM2018-12-13T13:16:34+5:302018-12-13T13:18:44+5:30
डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डाक खात्यात कोणत्या कामाला किती वेळ लागेल याचे निर्धारण केले गेले आहे. त्यासाठी ‘नागरिक वचन पत्र’ असे फलक प्रत्येक डाक कार्यालयात लावले गेले आहे. परंतु हे वचन पत्र थोतांड ठरत आहे. कारण कोणत्याही कामासाठी दोन ते पाच मिनिटांची हमी डाक विभागाकडून दिली गेली असली तरी प्रत्यक्षात त्या कामांसाठी एक ते दोन तास लागतात. ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. हे चित्र कुण्या एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यात बहुतांश हीच स्थिती आहे.
स्पर्धेच्या युगात एकीकडे बँका झपाट्याने कात टाकत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन ग्राहकांना अधिक तत्परत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या तुलनेत डाक विभागाचा कारभार अद्यापही ‘दिन मे ढाई कोस’ असाच असल्याची ओरड ग्राहकांमधून ऐकायला मिळते.
कार्यालये चकाचक, व्यवस्था मात्र ‘जैसे थे’
प्रमुख डाक कार्यालये चकाचक झाली असली तरी तेथील व्यवस्था व सुविधा मात्र जैसे थेच आहे. प्रत्येक डाक कार्यालयात ‘नागरिक वचन पत्र’ लागलेले आहेत. कोणते काम किती मिनिटात होईल, याची हमी त्यावर दिली गेली आहे. डाक सेवा, अल्प बचत, बचत पत्रे, आर्थिक बाजार, मयत दावा मामले यातील कामे किमान दोन मिनिटे व कमाल २० मिनिटात होईल, असे या हमी पत्रावर नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती याच्या उलटी आहे. ग्राहकांना कोणत्याही कामासाठी तासन्तास रांगेत रहावे लागते. साधी पास बुक एन्ट्री करायची असेल तर वारंवार येरझारा माराव्या लागतात.
‘लिंक नाही’ म्हणून यंत्रणेचे हातवर
‘लिंक नाही’ हे ठेवणीतील उत्तर प्रत्येक वेळी पुढे करून डाक कर्मचारी स्वत:ची सुटका करून घेताना दिसतात. आधीच डाक कार्यालयांची संख्या कमी, त्यात एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. डाक कार्यालयांवर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. परंतु सेवा व्यवस्थित नसल्याने बहुतांश ग्राहकांनी डाक कार्यालयाकडे पाठ फिरवून बँकांना पसंती दिली आहे. आपल्याकडील ग्राहकांची गर्दी कमी झाली म्हणून तेथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नाही किंवा ग्राहक वाढावे म्हणून या कर्मचाऱ्यांनी तसदी घेतल्याचे ऐकिवात नाही. ग्राहकांना तेथे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. विविध एजंट असले तरी ते बहुतांश कामे ग्राहकांनाच करायला सांगतात. स्वत: केवळ बसल्या ठिकाणावरून सूचना देतात.
वयोवृद्ध तासन्तास रांगेत
डाक विभागाच्या संथ सेवेमुळे वयोवृद्धांनासुद्धा तासन्तास रांगेत ताटकळत रहावे लागते. त्यांच्यासाठी प्रतीक्षागृहात पुरेशा खुर्च्या, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. डाक कार्यालयातील ही सर्व व्यवस्था पाहता ‘नागरिक वचन पत्र’ थोतांड ठरत असल्याचे दिसते. कर्मचारी कमी आहेत, लिंक नाही अशी कारणे पुढे करून डाक यंत्रणा स्वत:चा बचाव करताना दिसते. ‘बोलणे विकत घ्यावे लागेल’ अशी काही डाक कर्मचाऱ्यांची वर्तवणूक असल्याचे सांगितले जाते. एकूणच डाक सेवेवर ग्राहक समाधानी नसल्याचे स्पष्ट होते. काही तक्रारी असल्यास नेमकी कुणाकडे दाद मागावी, त्यांचे संपर्क क्रमांक हेसुद्धा डाक कार्यालयात नमूद नसतात. त्यामुळेच जनतेत विश्वास असूनही डाक सेवेबाबत नाराजी पहायला मिळते.