मारेगाव - तेल्हारा (जि. अकोला) येथील काही नागरिक ताडगोहा (भिखू )(जि. चंद्रपूर) येथे खासगी ट्रॅव्हल्सने जात असताना वणी-यवतमाळ मार्गावरील गौराळा (ता. मारेगाव) बसथांब्याजवळ नादुरस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर ट्रॅव्हल आदळली. या भीषण अपघातात ५० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात गुरूवारी रात्रीच्या सुमारास (दि. २८सप्टेंबर) घडला. या वेळी ट्रॅव्हल्समध्ये ५० प्रवासी असल्याची माहिती एका जखमीने दिली. यातील काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तात्काळ यवतमाळ येथे रेफर केले आहे.
हे लोक तेल्हारा परिसरातील चार ते पाच गावातील होते, अशी माहिती मिळते. उभ्या ट्रकवर ट्रॅव्हल्स धडकताच ट्रॅव्हल्सचा समोरील भाग संपूर्ण चकनाचूर झाला. यावेळी चालकासह केबिनमध्ये बसून असलेल्या दोन महिला प्रवासी व दोन पुरुष प्रवाशी अडकून होते. त्यांना गॅस कटरने ट्रक कापून बाहेर काढण्यात आले.
घटनेचे वृत्त कळताच, मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मारेगाव तालुक्यात एकही रुग्णवाहिका नसल्याने वणी व पांढरकवडा येथून रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. त्यामुळे जखमी रुग्ण दवाखान्यात पोहचण्यास वेळ लागला.
येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जवळ पास ४० रुग्णांना चंद्रपूर, वणी, यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. जखमींची नावे मिळू शकली नाहीत.