शेतकऱ्याचा मुलगा बनला पीएसआय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:10 PM2019-03-29T22:10:04+5:302019-03-29T22:10:48+5:30
तालुक्यातील नारायणपेठ या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी रमेश आंबेपवार यांचा मुलगा अंकित याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यातील नारायणपेठ या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी रमेश आंबेपवार यांचा मुलगा अंकित याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड करण्यात आली आहे.
अंकितच्या यशाबद्दल त्याचा ग्रामस्थांनी नागरी सत्कार केला. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, देवानंद पवार, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार, स्वामी काटपेल्लीवार, शैलेश इंगोले, हेमंतकुमार कांबळे, संजय डंभारे, संजय निकडे, रुपेश कल्यमवार, साहेबराव पवार आदी उपस्थित होते. अंकित पर्यावरण शास्त्रात एम.एस्सी. झाला. तो एकुलता एक मुलगा आहे. पालकांनी त्याला शिक्षणासाठी गंगापूर जि.औरंगाबाद येथे आजोळी ठेवले. त्याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण वसतिगृहात झाले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात झाले. त्याने क्रिकेटमध्ये चारदा राज्यस्तरीय प्रथमश्रेणी व तिनदा राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.
पुणे येथे सहा महिने एमपीएससीचे क्लासेस करून नंतर दोन वर्षे अभ्यास करून त्याने दुसऱ्या प्रयत्नात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. खेळाडू प्रवगार्तून त्याची पीएसआय पदासाठी निवड झाली. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी झालेल्या अंकितचे तालुक्यात कौतुक होत आहे.