मारेगाव येथील नाफेडची हरभरा खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:23 PM2018-04-24T22:23:47+5:302018-04-24T22:23:47+5:30
हरभऱ्याचे पोते उचलण्यासाठी हमाल उपलब्ध नाही, खरेदी केलेला चणा साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नाही, या व अशा अनेक कारणांनी येथील बाजार समितीत नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : हरभऱ्याचे पोते उचलण्यासाठी हमाल उपलब्ध नाही, खरेदी केलेला चणा साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नाही, या व अशा अनेक कारणांनी येथील बाजार समितीत नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. यामुळे मारेगाव तालुक्यातील २०० शेतकºयांची हरभरा विक्री रखडली आहे.
मारेगाव येथील बाजार समितीच्या यार्डात ४ एप्रिलला नाफेडतर्फे चणा खरेदीला प्रारंभ केला खरा; परंतु दुसऱ्या दिवशीपासून चणा खरेदी बंद करण्यात आली. नाफेडने खरेदी केलेला माल गोडावूनपर्यंत पोहचविण्यासाठी मारेगाव बाजार समितीत नऊ हमाल आहेत. या हमालांना १० रुपये क्विंटलप्रमाणे मजुरी देण्यात येते. या मजुरीत त्यांना काटा करणे, पोत्यांची शिलाई करणे, भरलेली पोती गोडावूनपर्यंत नेऊन गोडावूनमध्ये त्याची थप्पी मारणे, अशी कामे या हमालांना करावी लागतात. तूर खरेदीमुळे बाजार समितीचे गोडावून फुल्ल झाले आहे. परिणामी चणा साठविण्यासाठी बाजार समितीच्या यार्डापासून काही अंतरावर दुसरे गोडावून आहे. मात्र इतक्या अल्प मजुरीत हमालीचे काम करणे परवडत नसल्याने हमालांनी काम करणे बंद केले आहे. परिणामी तालुक्यातील २०० शेतकऱ्यांना चणा विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नाफेडतर्फे हरभऱ्याला तीन हजार रुपये हमी भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांचा कल नाफेडला हरभरा विकण्याकडे आहे. आता शेतीचा नवा हंगाम तोंडावर आला असू बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. मात्र अद्याप नाफेडचा तिढा न सुटल्याने चणा घरातच साठवून आहे.