पुसद, उमरखेड विभागात पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:00 AM2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:09+5:30
पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद /उमरखेड : गेल्या काही दिवसांपासून पुसद आणि उमरखेड उपविभागात पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने शेतकऱ्यांना संकटाच्या खाईतच लोटले. पुसद उपविभागात दोन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. उमरखेड उपविभागातही संततधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहे.
पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली सापडली आहे. पुसद तालुक्यात ब्राह्मणगाव, गौळ खु., वरूड, बोरी खु., जांबबाजार, शेंबाळपिंपरी, बेलोरा, खंडाळा आणि पुसद सर्कलमध्ये सातत्याने पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सोबतच पावसाची रिपरिपही सुरू होती. पुसद आणि दिग्रस तालुक्यातील शेती पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनला जागीच कोंब फुटले आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी संभाजीराव टेटर यांनी केली आहे. आमदार इंद्रनील नाईक यांनीही कृषी विभागाकडे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सर्व मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
उमरखेड तालुक्यातही पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. पैनगंगा नदी काठावरील ५५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदी काठावरील शेकडो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली सापडली आहे.
सोयाबीनला जागीच कोंब फुटत असल्याने शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहे. आमदार नामदेव ससाने यांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन उमरखेड व महागाव तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.
दिग्रस आणि महागाव तालुक्यात नुकसान
पुसद आणि उमरखेड उपविभागातील दिग्रस आणि महागाव तालुक्यातही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी देशोधडीला लागत आहे. अनेकांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांकडे आपबिती कथन केली. काही शेतकºयांनी कृषी अधिकाºयांना सडलेले सोयाबीन दाखवून तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली.