सर्वत्र पावसाची रिपरिप सुरूच
By admin | Published: July 16, 2014 12:29 AM2014-07-16T00:29:08+5:302014-07-16T00:29:08+5:30
दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी तालुक्यात १४ जुलैच्या सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दमदार आणि मुरवणी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या
वणी : दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी तालुक्यात १४ जुलैच्या सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दमदार आणि मुरवणी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. शेती पिकांसाठी हा पाऊस समाधानकारक असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.
यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा प्रचंड अडचणीत सापडला आहे़ पावसाळ्याच्या दीड महिन्याच्या कालावधीत मोजून तीनच वेळा पाऊस पडला़ पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी जोमाने खरीपातील कपाशीची पेरणी केली. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी बळीराजावर दुबारच नव्हे तर तिबार पेरणी करण्याचे संकट ओढवले. त्यासाठी त्यांना सावकारांचे उंबरठे झीजवावे लागले. घरातील लक्ष्मीचे असले-नसले सोने गहाण ठेवावे लागले. त्यातून दुबार, तिबार पेरणीसाठी कशी तरी त्यांनी बियाण्यांची तजवीज केली. मात्र दुबार, तिबार पेरणी करूनसुध्दा पाऊस न आल्याने पेरलेले बियाणे मातीतच सडले. त्यामुळे बळीराजाला प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
आता दोन दिवसांपासून शेती पिकांना पोषक असा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा जिवात जीव आला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. गेल्या २४ तासांपासून पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. मात्र आता बहुतांश शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नसल्याने पुन्हा नव्याने पेरणी कशी करावी, असा यक्षप्रश्न त्यांना सतावत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा बळीराजाची धडपड सुरू झाली आहे.
कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांची नाजूक आर्थिक स्थिती बघता बियाणे संपल्याच्या पाट्या लावल्या आहेत. त्यांना उधारीत बियाणे द्यायला ते तयार नाही़ ज्या शेतकऱ्यांकडे पैसे आहे, त्यांना मात्र मागच्या दारातून बियाणे मिळत आहे़ आता बियाणे घ्यायला शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या बियाण्याअभावी पडित राहण्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ (लोकमत चमू )