लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : मेंढ्यांना चराईकरिता शासनाने चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बुधवारी मेंढपाळांनी मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा पोलिसांनी अडविला.तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ वास्तव्याला आहे. दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे मेंढी चराईकरिता प्रशासनाने चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, यामागणीकरिता बुधवारी मेंढपाळ समाजाने मेंढ्या व घोड्यांसह मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा तहसीलकडे जात असताना पोलिसांनी तो मधातच अडविला. जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याने मोर्चाला प्रतिबंध केल्याचे ठाणेदार संजय खंदाडे यांनी सांगितले.गेल्या दहा दिवसांपासून वरूड (ज) येथील वन विभागाच्या जंगलात सदर मेंढपाळ मेंढ्या व घोडे चराईकरिता जात आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी त्यांना मनाई करीत आहे. यातूनच मेंढपाळांनी वन कर्मचाºयांवर गोटमारही केली होती. त्यात एक कर्मचारी जखमी झाला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आठ मेंढपाळांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेनंतर मेंढपाळांनी मोर्चासाठी पोलिसांना अर्ज दिला. पोलिसांनी तहसीलदारांची रितसर परवानगी मिळाल्यानंतरच मोर्चा काढण्याचे निर्देश दिले होते. तरीही बुधवारी मेंढपाळांनी मोर्चा काढला. पोलिसांनी त्याला प्रतिबंध केल्यानंतर क्रांती चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राळेगावात मेंढपाळांचा मोर्चा अडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 10:09 PM