यवतमाळ : धामणगाव मार्गाच्या रुंदीकरणात तोडलेल्या शेकडो झाडांपैकी १७ झाडांचे जांब फॉरेस्ट पार्कमध्ये पुनर्रोपण करण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ एकाच झाडाला पालवी फुटली आहे. त्यामुळे पुनर्रोपणासाठी झालेला खर्च वाया गेला आहे. यवतमाळ शहरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ता निर्मितीचं काम सुरू आहे. यवतमाळ-धामणगाव मार्गाचे रुंदीकरणही होत आहे. या मार्गावर ब्रिटिश काळापासून गर्द सावली देणारी कडूलिंबाची शेकडो झाडे आहेत. या झाडांमुळे स्टेट बँक चौकापासून मोहा फाट्यापर्यंत गर्द सावली होती. परंतु रस्त्याच्या रुंदीकरणात या झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. पर्यावरणाचा प्रश्न पुढे आल्यानं वृक्षांचं पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर झाडांना मुळासह उखडून त्यांचं जांब मार्गावरील फॉरेस्ट पार्कमध्ये पुनर्रोपण करण्यात आलं. फॉरेस्ट पार्कमध्ये शेकडो वृक्षांचं पुनर्रोपण केलं जाणार होतं. मात्र शेकडो वृक्षांपैकी केवळ १७ वृक्ष जांबच्या फॉरेस्ट पार्कमध्ये पोहोचले. या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात आलं. विशाल वृक्ष पुन्हा लावताना त्यांची योग्य काळजी घेणं गरजेचे होतं. मात्र या सर्व बाबींना फाटा देण्यात आला. मोठमोठे खड्डे करून त्यात वृक्ष लावण्यात आले. या १७ वृक्षांपैकी आता केवळ एकाच वृक्षाला पालवी फुटली. इतर वृक्ष आहे त्या स्थितीतच आहे. तर दुसरीकडे धामणगाव मार्गावर प्रचंड वृक्षतोड झाल्यानं परिसर ओसाड झाला आहे.
यवतमाळ: पुनर्रोपण केलेल्या झाडांपैकी फक्त एकाच झाडाला पालवी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 2:16 PM