अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने ३० लाख हेक्टरला फटका; सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके मातीमोल

By रूपेश उत्तरवार | Published: October 20, 2022 02:19 PM2022-10-20T14:19:48+5:302022-10-20T14:19:55+5:30

दिवाळीच्या तोंडावर गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव

Return rains hit 30 lakh hectares of crops; Soybean, cotton, vegetable damages | अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने ३० लाख हेक्टरला फटका; सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके मातीमोल

अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने ३० लाख हेक्टरला फटका; सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके मातीमोल

Next

यवतमाळ : यावर्षी प्रारंभापासूनच पावसाने राज्यभर कहर केला आहे. आता परतीचा पाऊसही कहर करीत आहे. आतापर्यंत राज्यात ३२ जिल्ह्यांमध्ये ३० लाख हेक्टरला फटका बसला आहे. परतीच्या पावसाने दोन लाख हेक्टरवरची पिके मातीमोल झाली आहेत. या पावसाचा फटका विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रालाही बसत आहे. दिवाळीच्या तोंडावर काढणीला आलेले पीक हातातून जात असल्याने शेतकऱ्यांना हादरा बसला आहे. गावखेड्यात पावसामुळे नुकसानीचे तांडव सुरू आहे.

यावर्षी संपूर्ण राज्यभरात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या काळात २६ लाख हेक्टरला पुराचा आणि पावसाचा फटका बसला. सप्टेंबर महिन्यात जोमात असलेली पिके नष्ट झाली. ऑक्टोबरमध्ये काढणीला आलेली दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. याचा फटका १६ जिल्ह्यांना बसला आहे. अचानक बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना अंदाज बांधणेही अवघड झाले आहे.

नवरात्रात सतत पाऊस होता. पावसाने उसंत घेताच शेतकऱ्यांनी काढणीला आलेले सोयाबीन आणि कापसाच्या वेचणीला सुरुवात केली. मात्र, पाऊस बरसतच असल्याने सोयाबीनला काेंब फुटत आहेत, तर कापसाचे बोंड काळवंडले असून बोंडसडीचा धोका वाढला आहे. याशिवाय सोयाबीनही काळे पडत आहे.

शेतशिवारात हंगाम पूर्ण करण्यासाठी मजूरही मिळणे अवघड आहे. मजुरांचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. ३५० रुपये रोज याप्रमाणे अतिशय महागडा दर शेतमजुरांना द्यावा लागत आहे. दुसरीकडे शेतमालास मिळणारे दर घसरले आहेत. पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांना सर्वेक्षणाचे आदेश

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतशिवारात झालेल्या नुकसानीचा आकडा आणखी मोठा आहे. येत्या काही दिवसात याबाबतचा अहवाल पुढे येणार आहे.

आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान

राज्यात एक कोटी ४६ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यातील ३० लाख हेक्टरवरचे पीक अतिपावसासह परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त झालेले आहे. आजपर्यंत झालेल्या नुकसानीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले हे पहिले नुकसान आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ११ हजार हेक्टरला फटका बसला. आतापर्यंत चार लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा वाढतच आहे. सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत.

- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक

Web Title: Return rains hit 30 lakh hectares of crops; Soybean, cotton, vegetable damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.