शिक्षकांच्या हक्कासाठी ‘विमाशि’ कटीबद्ध
By admin | Published: January 23, 2015 12:09 AM2015-01-23T00:09:44+5:302015-01-23T00:09:44+5:30
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या हक्कासाठी कटीबद्ध आहे. मात्र संबंधितांकडून समस्या सोडविण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे, असे मत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे...
यवतमाळ : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या हक्कासाठी कटीबद्ध आहे. मात्र संबंधितांकडून समस्या सोडविण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे, असे मत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी मांडले. संघाच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. प्रांतिक उपाध्यक्ष राम बरोटे हे अध्यक्षस्थानी होते.
येथील सहकार भवनात आयोजित अधिवेशनात जिल्हाभरातून शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा कार्यवाह अरविंद देशमुख यांनी संघटनेने मागील वर्षभरात केलेली आंदोलने आणि सोडविलेल्या समस्या याची माहिती दिली. प्रसंगी डायगव्हाणे यांनी २०१३-१४ ची संच मान्यता कशी चुकीची आहे आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर मार्गदर्शन केले. २००५ पूर्वी लागलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी या व इतर समस्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
संघाचे जिल्हाध्यक्ष अशफाक खान, नागपूर जिल्हा कार्यवाह कारेमोरे, अमरावती जिल्हाध्यक्ष गजानन बुरघाटे, वाशिम जिल्हाध्यक्ष जनार्दन शिंदे, सुरेंद्र कडू यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रसंगी माजी कार्यवाह एम.डी. धनरे, माजी कार्याध्यक्ष चोपडे, साहेबराव गावंडे, अंकुश वाकडे, पवन बन उपस्थित होते. यानिमित्त झालेल्या आमसभेत नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.डी. धनरे तर सहायक म्हणून उमाकांत चोपडे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)