साहेब, किती दिवस तग धरू ?
By Admin | Published: September 24, 2015 02:56 AM2015-09-24T02:56:12+5:302015-09-24T02:56:12+5:30
शेती पिकत नाही, पिकलेल्या शेतमालाला भाव नाही, बँकेवाले कर्ज देत नाही, सिंचनाचे प्रकल्प अपुरे आहे, मजुरांच्या हाताला काम नाही, सरकारी दवाखान्यात उपचार होत नाही,...
शरद पवारांपुढे शेतकऱ्यांची कैफियत : पिंपरी, भांबराजा आणि बोथबोडनला भेट
सुरेंद्र राऊत/रूपेश उत्तरवार पिंपरीबुटी (यवतमाळ)
शेती पिकत नाही, पिकलेल्या शेतमालाला भाव नाही, बँकेवाले कर्ज देत नाही, सिंचनाचे प्रकल्प अपुरे आहे, मजुरांच्या हाताला काम नाही, सरकारी दवाखान्यात उपचार होत नाही, साहेब तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस तग धरायचा, अशी कैफियत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यापुढे शेतकऱ्यांनी मांडली.
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरीबुटी, भांबराजा, बोथबोडन येथे बुधवारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन शरद पवारांनी त्यांच्या समस्या ऐकल्या. त्यावेळी शेतकरी व शेतमजुरांनी समस्यांचे गाठोडेच शरद पवारांपुढे उघडले. यवतमाळ तालुक्यातील पिंपरीबुटी येथे शरद पवार सकाळी ९.१५ वाजता पोहोचले. उपसरपंच वंदना जरीले यांच्या घरासमोर शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी सोसायटीचे सभासद किती, कर्ज किती लोकांना मिळाले, ग्रामपंचायतीची निवडणूक कशी झाली, गावात पदवीधर किती, नोकरीमुळे बाहेरगावी असणाऱ्यांची संख्या, शाळेची स्थिती आदीबाबत विचारणा केली. त्यावर गावकऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. कर्जमाफीचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. उलट उत्पादन खर्च वाढत आहे. विम्याचा हप्ता अधिक आणि मदत कमी अशी स्थिती असल्याचे सांगितले. स्थानिक सिंचनासाठी बांधलेला प्रकल्पही अपूर्ण तर आहेच परंतु चुकीच्या ठिकाणी बांधल्याचे या वेळी उपस्थितांनी सांगितले. शरद पवार यांनी जयश्री संजय गोडे, विमला श्रीराम देहारकर या शेतकरी विधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तर बेबी प्रकाश राठोड हिने सरकारी दवाखान्यात उपचार होत नसल्याचे सांगितले. त्यावेळी शरद पवारांनी आमदार संदीप बाजोरिया यांना उपचाराकडे लक्ष देण्याची सूचना केली.
यानंतर शरद पवार यांचा ताफा यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथे पोहोचला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना विविध समस्या सांगितल्या. गावात पाण्याची सुविधा नाही, बोर्डा धरणाचे काम रखडले आहे. जलयुक्त शिवार योजनेत स्थानिक आमदारामुळे गावाचा समावेश झाला नव्हता. शेवटी आम्ही आंदोलन केले. त्यानंतर या योजनेत गाव समाविष्ठ झाले अशी माहिती उपसरपंच डिवरे यांनी दिले. भांबराजा गावात बहुतांश शेती पडिक असल्याचे सांगत बँका नवीन सभासदांना कर्ज देत नसल्याची समस्या यावेळी गावकऱ्यांनी मांडली. २००५ च्या शासन आदेशानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शासनाच्या मदतीस पात्र ठरत नसल्याचा मुद्दाही अनेक शेतकऱ्यांनी मांडला. निकषात बदल करण्याची मागणी करण्यात आली. कापसाला एकरी साडेसहा हजार आणि सोयाबीनला साडेपाच हजार रुपये भाव देण्याची मागणीही अनेकांनी येथे केली.
२० शेतकरी आत्महत्या झालेल्या बोथबोडन गावातही शरद पवारांपुढे समस्या मांडण्यात आल्या. या गावातील केवळ आठ शेतकरी आत्महत्या पात्र झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावाच्याजवळ तीन धरणे आहेत. परंतु एकाचेही काम पूर्ण झाले नाही. ५४ विहिरी गावात परंतु पाणी नाही, अशी अवस्था आहे. वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या ७७ शेतकऱ्यांना काम पट्टे देण्याची मागणी केली. तर आनंद कनिराम राठोड या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याचे दोन नातू उघड्यावर आल्याचे गावकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले. आनंदचा मुलगा आणि सून एका अपघातात ठार झाले. त्यानंतर कर्जबाजारीपणाला कंटाळून आनंदाने आत्महत्या केली. आता ही दोनही मुले उघड्यावर आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. येथील सरपंच दिनेश पवार यांना शरद पवार यांनी थेट प्रश्न करीत रोहयोतून कामाची मागणी का केली नाही, असे विचारले. त्यावर दिनेश पवार म्हणाले, मागणी केली होती, परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले.
या दौऱ्यात आमदार मनोहरराव नाईक, राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, सभापती लता खांदवे, प्रवीण देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, यवतमाळ पंचायत समितीच्या सभापती गायत्री ठाकूर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष क्रांती राऊत आदी उपस्थित होते.
तुमच्याच पायी डुबलो
शेतीसोबत कापसाचा धंदा हाती घेतला. तुम्ही त्यावेळी सात हजाराच्या भावाची चर्चा केली. आपलाच माणूस कृषिमंत्री आहे म्हणून मी पाच हजाराने कापसाची खरेदी केली, तुम्ही तेढ्यातच निर्यात बंदी केली, शेवटी रडू-रडू कापूस तीन हजारात विकावा लागला. नफा तर सोडा पाच एकर शेतही विकावे लागले, असे खडेबोल एका युवा शेतकऱ्याने शरद पवारांना सुनावले. त्यावेळी शरद पवारही अचंबित झाले.
कसं जगायचं शेतमजुरांनी
शेती आहे, जमीनजुमला आहे तेच मरुन रायले. त्यायलेचं सरकार पैसे देऊन रायले, आमाले रोजमजुरी भेटत नाही. कसं जगायचं आम्ही शेतमजुरांनी ? असा थेट सवाल पिंपरीबुटी येथे शेतमजूर महिला अनिता दुकाळे यांनी शरद पवारांना केला.
दारूबंदीचा निर्णय घ्या
कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव, नापिकी यापैकी तुमच्या हाती काहीही नाही, असे शरद पवार यांनी भांबराजा येथे उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. मात्र गावात दारूबंदीचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, दारूचे प्रमाण कमी करू शकता या दृष्टीने विचार करण्याचा सल्ला दिला.