अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ते साल होते १९९८... बाबांसोबत गावातल्या शेळ्या चारणारा सत्येंद्र बारावीत इंग्रजीत नापास झाला. पुढे शिकण्याची ऐपत नव्हतीच. पण हिंमत जुळवली. शिकत राहिला. मेहनत फळली आणि खेड्यातला हा तरुण चक्क बहुराष्टÑीय कंपनीचा मॅनेजर बनला! सत्येंद्र भानुदास नंदेश्वर असे त्याचे नाव.
घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा हे आदिवासीबहुल खेडे सत्येंद्रचे जन्मगाव. वडील शेळ्या चारुन उदरनिर्वाह करायचे. गावातल्या शाळेत शिकून सत्येंद्र घाटंजीच्या गिलाणी महाविद्यालयात आला. बारावीत इंग्रजीने दगा दिला. त्यानंतर परीक्षा देऊन तो पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला.
शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रीशियन ट्रेडमध्ये उत्तीर्ण झाल्यावर त्याने दररोज ६० किमी. सायकलवर प्रवास करून यवतमाळच्या शासकीय पॉलिटेक्निकमध्ये तीन वर्षांचा इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग डिप्लोमा ७३.७७ टक्के गुणांनी उत्तीर्ण केला. त्यानंतर २००७ मध्ये तो प्रथम श्रेणीत बीई झाला. त्याला इंडियन ट्रान्सफॉर्मर लिमिटेड कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर जर्मनीच्या सीमेन्स कंपनीने वीज पारेषण विभागात सर्व्हिस मॅनेजर पदावर नोकरी दिली. आता तो टीम घेऊन कोलंबो, केनिया, सिंगापूर, नैरोबी आदी देशात असाईन्मेंटवर जातो. बऱ्याचदा त्याच्यासाठी खास विमानाची सोय केली जाते.१५ जुलैला जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्या हस्ते सत्येंद्रचा आॅनलाईन पद्धतीने गौरव करण्यात आला.